विमान उड्डाणात अडसर ठरणा-या मुंबईतल्या 70 इमारतींची उंची कमी करण्याचे आदेश
By admin | Published: July 16, 2017 11:34 AM2017-07-16T11:34:34+5:302017-07-16T11:34:34+5:30
विमानाच्या उड्डाणात अडथळा आणणा-या मुंबईतल्या 70 इमारतींना उंची कमी करा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - विमानाच्या उड्डाणात अडथळा आणणा-या मुंबईतल्या 70 इमारतींना उंची कमी करा, असे आदेश नागरी उड्डयन संचलनालयानं दिले आहेत. उंची कमी करण्यासाठी सांगण्यात आलेल्यांमध्ये मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारील विलेपार्ले, सांताक्रूझ, घाटकोपर परिसरातील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींची उंची कमी करण्यासाठी 60 दिवसांचा अवधीही देण्यात आला आहे.
या 70 इमारतींना जून महिन्यात नागरी उड्डयन संचालनालयाचे नोटीस बजावली होती. नोटीस बजावलेल्या इमारतींमध्ये 50 वर्षांहून जुन्या इमारतींचाही समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणानेच 1978पासून या इमारतींना "ना हरकत प्रमाणपत्र" बहाल केले होते. नोटीस बजावण्यात आलेल्या इमारतींमधील रहिवाशांकडे भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली प्रमाणपत्रे आहेत. मात्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेली कागदपत्रे बोगस असल्याचा दावा नागरी उड्डयन संचलनालयानं केला आहे.
जूनमध्ये नोटीस बजावून विमानाच्या उड्डाणात अडसर ठरणा-या इमारतीच्या सोसायट्यांना कायदेशीर नोटीसही बजावली होती. नोटिसीत ऑगस्ट महिन्यापर्यंतची मुदतही दिलीय. नागरी उड्डाण संचलनालयाच्या आदेशामुळे आता या इमारतींना 1 ते 6 मीटरनं उंची कमी करण्यासाठी पाडकामही करावे लागणार आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नागरी उड्डयन संचलनालयाला विमानांच्या उड्डाणात अडथळा आणणाऱ्या इमारतींची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नागरी उड्डयन संचलनालयानं ही कारवाई केली आहे.
नागरी उड्डाण संचलनालयाकडून आदेश देण्यात आल्यानंतर 10 सोसायट्यांच्या प्रतिनिधींची विलेपार्ले येथे बैठकही पार पडली. दोन मजल्यांच्या इमारतींची उभारणी 1960मध्ये करण्यात आली आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिसूचना किंवा आदेश सोसायट्यांना देण्यात आले नव्हते, असा नोटीस बजावण्यात आलेल्या सोसायट्यांमधील रहिवाशांचा दावा आहे. 2016मध्ये नागरी उड्डाण संचलनालयाने या सोसायट्यांकडे उंची, एरोड्राम रेफरन्स पॉटपासूनचे अंतर आणि उभारणीचे वर्ष यासंबंधीची माहिती मागवली होती.