सुरेश वाडकरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश
By admin | Published: June 24, 2014 08:55 PM2014-06-24T20:55:48+5:302014-06-25T14:09:28+5:30
भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा नंतरच्या काळात भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक : भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा नंतरच्या काळात भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हेमंत बापूराव कोठीकर यांनी याबाबत न्यायदंडाधिकारी श्रीमती जयश्री पुनावाल यांच्यासमक्ष अॅडव्होकेट मंदार भानोसे यांच्यामार्फत हा दावा दाखल केला आहे. १६ एप्रिल २००८ मध्ये तक्रारदार हेमंत कोठीकर, गायक सुरेश वाडकर, व सोनू आगमकुमार निगम या तिघांनी देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर ७/१३ येथील ७७ आर जमीन खरेदी करण्यासाठी जमीन मालक राजेश प्रभाकर दरगोडे व अजित प्रभाकर दरगोडे यांच्याशी खरेदीपूर्व साठेखत करारनामा करून व्यवहार निश्चित केला व त्यापोटी दरगोडेंना तिघांनी मोठ्या रकमाही अदा केल्या. त्यानंतर मात्र या जमिनीच्या व्यवहारात बरीच गुंतागुंत असल्याचे निदर्शनास आल्याने व्यवहारातील उर्वरित रक्कम गुंतागुंत मिटवून दिल्यानंतरच देण्यात येईल याची जाणीव दरगोडे यांना करून देण्यात आली, परंतु दरगोडे त्याची पूर्तता करू शकले नाहीत म्हणून दिवाणी न्यायालयात स्पेसिफिक परफार्मन्सचा दावा खरेदीदार तिघांनीही दाखल केला व सध्या तो न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही सुरेश वाडकर यांनी सदर जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर या दोघांना हाताशी धरून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी वादात सापडलेली मिळकत स्वत:च्या नावे लिहून घेतली, असे तक्रारदार कोठीकर यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे मिळकतीचा करारनामा लिहून घेऊन सुरेश वाडकर, विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांनी आपली फसवणूक करून आर्थिक नुकसान केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी विनंती कोठीकर यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर सुनावणी न्यायालयाने वाडकरांसह तिघांविरुद्ध कलम १५६ (३) सी.आर.पी.सी. अन्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून सविस्तर तपास करावा, असे आदेश दिले आहेत.