आदेशाचे स्वागत

By Admin | Published: August 12, 2014 02:54 AM2014-08-12T02:54:46+5:302014-08-12T02:54:46+5:30

दहीहंडीतील गोविंदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनोऱ्यांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे मुंबई डबेवाला गोविंदा पथकाने स्वागत केले आहे

Order Welcome | आदेशाचे स्वागत

आदेशाचे स्वागत

googlenewsNext

मुंबई : दहीहंडीतील गोविंदांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नको आणि मनोऱ्यांची उंची २० फुटांपेक्षा जास्त नको, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे मुंबई डबेवाला गोविंदा पथकाने स्वागत केले आहे. शिवाय उपनगरातील आयोजकांनी या वर्षी दहीहंडी उभारणार नाही, असे प्रसारमाध्यमांकडे स्पष्ट केले आहे.
मुंबई डबेवाला गोविंदा पथक पाच थरांचा सराव करत आहे. पथकाचा सराव अंधेरी रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ६च्या लगत सुरू आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत या गोविंदा पथकाचा सराव सुरू असून, हे
गोविंदा पथक दहीहंडी फोडून जी रक्कम जमा होणार आहे; ती माळीणच्या दुर्घटनेत बचावलेल्या रुंद्र लेंबे याला मदत म्हणून देण्यात येणार आहे.
दुसरीकडे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीदेखील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लिहिलेल्या पत्रात दहीहंडीवर बालगोविंदांना चढविण्याबाबत बंदी घालण्यात यावी, असे म्हटले आहे. शिवाय याच्या अंमलबजावणीबाबत लक्ष घालण्यात यावे, असे म्हटले आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांनी मनेका गांधी यांना यासंदर्भातील पत्र धाडले होते; यावर हे पाऊल उचलले आहे.
पार्ल्यातील हंडी रद्द
विलेपार्ले येथील काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे यांनीदेखील मुंबई उच्च न्यायालयाचे स्वागत केले आहे. विलेपार्ले येथील भोगले चौकात उभारण्यात येणारी दहीहंडी या वर्षी उभारण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दहीहंडीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण, जखमी होणारे गोविंदा आणि बालगोविंदांना होणारा त्रास; या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयानंतर अनेक गोविंदा पथकांनी दूरध्वनीहून त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचेही हेगडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Order Welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.