मशिदींवरील बेकायदा भोंगे काढण्याचे आदेश
By Admin | Published: August 29, 2015 01:58 AM2015-08-29T01:58:43+5:302015-08-29T01:58:43+5:30
मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च
मुंबई : मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर लावलेले भोंगे परवानगी घेऊन लावले आहेत की नाही याची शहानिशा करा व विना परवानगी मशिदींवर भोंगा लावला असल्यास तो काढून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा राज्य शासनाला दिले.
गेल्या वर्षी ३० जुलैला न्यायालयाने हे आदेश शासनाला दिले होते. यासाठी नवी मुंबईतील संतोष पाचगळ यांनी अॅड. दीनदयाळ धनुरे यांच्यामार्फत फौजदारी जनहित याचिका केली आहे. नवी मुंबईतील अंदाजे ४९ मशिदींवर विना परवानगी भोंगे लावण्यात आले आहेत. तसेच रुग्णालय, शाळा व महाविद्यायल ही ठिकाणे शांतता क्षेत्र घोषित केली जातात. तरीही अशा ठिकाणीदेखील मशिदींवर भोंगे लावले आहेत. हे भोंगे काढून टाकावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
त्यावर न्या. व्ही.एम. कानडे व निवृत्त न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर गेल्या वर्षी सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने सण-उत्सवात परवानगी घेऊन लाऊडस्पिकर लावले जातात का, असा सवाल केला होता. त्याची दखल घेत याचिकाकर्त्याने माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मिळवली. त्यात सण-उत्सवात परवानगी घेऊनच लाऊडस्पिकर लावले जातात, अशी माहिती मिळाल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयासमोर स्पष्ट केले.
त्याची नोंद करून घेत न्यायालयाने मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवर परवानगी घेऊन भोंगे लावले गेले आहेत की नाही याची शहानिशा करण्याचे आदेश शासनाला दिले.
न्या. व्ही.एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर पुन्हा शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे अॅड. धनुरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. तसेच राज्यभरात कोठे मशिदीवर विना परवानगी भोंगा लावला असल्यास त्यावर कारवाई करावी, अशी नव्याने मागणी याचिकेत करण्यात आल्याचे अॅड. धनुरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.