मराठा आरक्षण: मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:46 PM2019-05-17T13:46:04+5:302019-05-17T14:25:30+5:30
न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई - न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने आज अध्यादेश जारी केला आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाबाबत दिलासा देण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामधील जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच प्रवेशाची मुदत ही 25 मेऐवजी 31 मे पर्यंत वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झालेले प्रवेश कायम ठेवण्यात येतील,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Maharashtra cabinet to issue an ordinance to amend SEBC Reservation Act 2018 to give protection to candidates in PG medical admissions.
— ANI (@ANI) May 17, 2019
मराठा आरक्षण लागू कऱण्याच्या निर्णयामुळे नुकसान होणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठीही राज्य सरकारकडून पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रातील महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. मात्र प्रवेश कायम झाल्याचे पत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही विद्यार्थ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.