महापौर बंगल्यातील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारने काढला अध्यादेश
By Admin | Published: January 4, 2017 06:17 PM2017-01-04T18:17:46+5:302017-01-04T18:17:46+5:30
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेसाठी राज्य सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला आहे. दादर शिवाजीपार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा एक रुपया या नाममात्र दराने 30 वर्षांसाठी भाडयाने देण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर त्यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेवरुन बरेच वाद झाले. अखेर देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा निश्चित केली. पण या जागेवरुनही वाद आहेत. याच भागात रहाणारे शिवसेना प्रमुखांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी देण्यास विरोध केला होता.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने जास्तीत जास्त मराठी मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी तसेच मित्रपक्ष शिवसेनेचे समाधान करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.