सेंद्रिय सीताफळाच्या बागेने फुलविला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:08 PM2018-10-20T12:08:59+5:302018-10-20T12:12:10+5:30
यशकथा : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या सीताफळाला मोठी मागणी मिळत आहे.
- शिवाजी पवार (श्रीरामपूर)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शेतकऱ्याने सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या सीताफळाला मोठी मागणी मिळत आहे. अवघ्या पाऊण एकरामध्ये वर्षाला एक लाख रुपये मिळकत होत आहे. विशेष म्हणजे सर्व मालाची महामार्गावर स्वत: हात विक्री करीत कष्टाने संसार फुलविल्याचा आदर्श त्याने उभा केला. मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या संजय शंकरराव वाघुले यांची ही यशोगाथा आहे.
शारीरिक व्याधीने त्रस्त झाल्याने त्यांनी फळबाग लागवड व विक्रीचा मार्ग शोधला. महामार्गावर शेती असल्याने त्याचा अचूक लाभ उठविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मात्र त्यामागे उत्तम नियोजन असल्याचे दिसून येते. मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी त्यांची जमीन आहे. सोळा बाय सोळा फुटांवर १२० झाडांची त्यांनी लागवड केली आहे. एका झाडाला २० किलोप्रमाणे फळ मिळत आहे. सध्या तीन वर्षापासून उत्पादन सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या मुंबई, पुणेसह परराज्यात सीताफळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याला किंमत चांगली मिळते. सीताफळापासून अनेकांना चांगला रोजगार मिळत आहे. टाकळीभान शिवारात श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर शेताच्या समोरच बसून संजय वाघुले हे स्वत: हात विक्री करतात. ५० ते ७० रुपये किलोप्रमाणे फळाला मागणी आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये एक लाख रुपयांवर उत्पन्न घेत असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षी उत्पन्नात आणखी वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. बागेला ठिबक सिंचनने पाणी दिले जाते. सीताफळाचे वैैशिष्ट्य म्हणजे या पिकावर मिलीबग या रसशोषक किडीवगळता अन्य कोणताही प्रादुर्भाव होत नाही. मिलीबगवर मिरची पावडर व पाण्याची फवारणी करून नियंत्रण मिळविल्याचे वाघुले यांनी सांगितले.
केवळ लेंडी खतावरच बाग फुलविली आहे. अन्य कुठलीही खते दिली जात नाहीत. या झाडांना शेळ्या-मेंढ्यांपासून कुठलाही उपद्रव होत नाही. अपरिपक्व फळांची चोरी देखील होऊ शकत नाही. त्यामुळेच आपण सीताफळाकडे वळाल्याचे वाघुले यांनी सांगितले. सध्या बाजारामध्ये सर्वच फळांच्या घाऊक व किरकोळ दरामध्ये मोठी तफावत आहे़ उदाहरणच द्यायचे झाल्यास आंबा व सीताफळाचे देता येईल. आंबा हा ३० ते ३५ रुपये किलो दराने विकला जातो.
मात्र, आंबे शंभर ते दीडशे रुपये किलोने विकले जातात. सीताफळाचेही तसेच आहे. दोनशे ते तीनशे रुपये क्रेटने (२०किलो) घाऊक दारात विक्री होणाऱ्या सीताफळाच्या खरेदीसाठी ग्राहकांना किलोमागे ५० ते ६० रुपये मोजावेच लागतात. यावर एक उपाय म्हणजे ग्राहकांनी शक्य तेवढ्याप्रसंगी थेट शेतकऱ्यांकडूनच माल खरेदी केला पाहिजे. तो देखील फारच कमी दरात मिळण्याची अपेक्षा ठेऊ नये. या गोष्टींचा सार काढायचा ठरल्यास टाकळीभान येथील या कष्टाळू शेतकऱ्याला दाद द्यायला हवी. स्वत:पुरते का होईना त्याने रोजगार निर्मिती केली आहे.