अवयवदान होणार आॅनलाइन

By admin | Published: August 31, 2016 05:55 AM2016-08-31T05:55:45+5:302016-08-31T05:55:45+5:30

गरजू रुग्णांची संख्या आणि अवयवदानात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. गरजू रुग्णांच्या तुलनेत १ टक्क्याहून कमी प्रमाणात अवयवदान होते

Organisation will be online | अवयवदान होणार आॅनलाइन

अवयवदान होणार आॅनलाइन

Next

मुंबई : गरजू रुग्णांची संख्या आणि अवयवदानात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. गरजू रुग्णांच्या तुलनेत १ टक्क्याहून कमी प्रमाणात अवयवदान होते. अवयवांची कमतरता असल्यामुळे ‘किडनी रॅकेट’सारखे प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी आणि अवयवदानाची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अवयवदानाचा टक्का वाढावा म्हणून राज्यभरात तीन दिवस ‘अवयवदान महाअभियाना’चे आयोजन वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या महाअभियानाचा शुभारंभ ३० आॅगस्टला नरिमन पॉइंट येथून ‘अवयवदान महारॅली’ने झाला. या महारॅलीचा शुभारंभ मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी झेंडा दाखवून केला. एअर इंडिया इमारतीपासून निघालेली रॅली जीएमसी जिमखान्यापर्यंत गेली. या महारॅलीत १० हजार मुंबईकर सहभागी झाले होते. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने हे मुंबईतील अभियानाचे संयोजक आहेत.
अवयवदान करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, विलंब होऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अवयवदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. आपल्या संस्कृतीत दानाला महत्त्व आहे. अन्नदान, रक्तदान अशा विविध दानांविषयी सांगितले आहे. आता आपल्याला अवयवदान आणि देहदानाचा विचार पुढे न्यायला हवा. संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जिवंत असताना आपल्याला शरीराचा मोह असतो. पण मेल्यावरही शरीराचा मोह असणे म्हणजे हा स्वार्थ आहे. मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या उपयोगी येणे यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही. हा विचार मनात रुजवून अवयवदान केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (प्रतिनिधी)

अवयवदान काळाची गरज
मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण त्या प्रमाणात मूत्रपिंडाचे दान होत नाही. १२ हजार रुग्णांना अवयवांची गरज आहे. त्यापैकी ११ हजार रुग्ण हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. पण वर्षाला जास्तीत जास्त १०० मूत्रपिंडांचे दान होते. यावरून स्पष्ट होते की अन्य रुग्णांना मूत्रपिंड मिळत नाही. अवयवदान ही काळाची गरज आहे. तीन दिवसीय महाअभियानानंतरही हे जनजागृतीचे कार्य अविरत सुरू राहिले पाहिजे. रोज अवयवदानाचे फॉर्म भरले जाणे आवश्यक आहे.
- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपमहापौर अलका केरकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, भाजपा नेत्या शायना एन.सी., सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ. मोहन जाधव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांची या वेळी उपस्थिती होती.

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी तीन दिवसीय महाअभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवयवदानाचा फॉर्म भरला.
मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस, वैद्यकीय आरोग्यमंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीदेखील आज अवयवदानाची शपथ घेतली.

एक खिडकी योजना हवी
अवयवदान करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर ते जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर अवयवदानात अडथळे येऊ नयेत म्हणून एक खिडकी योजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. अवयवदानाच्या फॉर्मची प्रक्रिया काही तासांत पूर्ण होईल यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. एक किडनी रॅकेट वैद्यकीय पेशाला बदनाम करू शकत नाही. भविष्यात येणाऱ्या डॉक्टरांनी एकनिष्ठपणे काम करायला हवे.
- डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग
अवयवदानाच्या महारॅलीत तब्बल १० हजार मुंबईकर सहभागी झाले होते. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. अवयवदान चळवळीला पुढे नेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील मुंबईकर या रॅलीत सहभागी झाले होते. त्याचबरोबर या रॅलीत अंध विद्यार्थीही सहभागी होते. ‘द्या, द्या... अवयव द्या’, ‘मरावे परि अवयवरूपी उरावे...’, ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ अशा घोषणांनी मरिन ड्राइव्ह परिसर सकाळी दुमदुमून गेला होता. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर्सही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Organisation will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.