‘सणाच्या काळात अवयवदान जागृती करा’
By admin | Published: September 3, 2016 12:34 AM2016-09-03T00:34:01+5:302016-09-03T00:34:01+5:30
अवयवदानाविषयी समाजात जनजागृती होत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हा सहभाग वाढण्यासाठी गणेशोत्सव आणि
मुंबई : अवयवदानाविषयी समाजात जनजागृती होत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हा सहभाग वाढण्यासाठी गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात अवयवदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. उत्सव मंडळांनी अवयवदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. सरकारने सुरू केलेल्या अवयवदान महाअभियान चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हायला हवे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारतर्फे ‘अवयवदान महाअभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय अभियानांतर्गत मुंबई विद्यापीठात अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. गुस्ताद डावर आणि जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. या वेळी १९ अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना महाजन यांनी पुढे सांगितले, विदेशात अवयव सहजतेने प्राप्त होतात. मात्र आपल्या देशात अंधश्रद्धेमुळे हे प्रमाण कमी आहे. ही अंधश्रद्धा कमी व्हायला पाहिजे. असे झाल्यास अवयवदानाचे प्रमाण वाढेल. (प्रतिनिधी)