आयोजकांची माघार
By admin | Published: August 28, 2015 02:35 AM2015-08-28T02:35:58+5:302015-08-28T02:35:58+5:30
न्यायालयाचे निर्बंध, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंचे घूमजाव, पोलिसांची भीती आणि मुख्यमंत्र्यांचे ‘मौन’ अशी चहूबाजूंनी गोविंदा पथकांची कोंडी झाल्याने दहीहंडी उत्सवावर
- स्नेहा मोरे, मुंबई
न्यायालयाचे निर्बंध, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंचे घूमजाव, पोलिसांची भीती आणि मुख्यमंत्र्यांचे ‘मौन’ अशी चहूबाजूंनी गोविंदा पथकांची कोंडी झाल्याने दहीहंडी उत्सवावर अजूनही संभ्रमाचे सावट टिकून आहे. याच कारणास्तव, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील बड्या आयोजकांनी दहीहंडी उत्सवातून माघार घेण्याचा शिरस्ता कायम राखला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये कमालीची अस्वस्थता असून, आता हा उत्सव नेमका कसा साजरा होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
मुंबई, ठाण्यातील जितेंद्र आव्हाड, कृष्णा हेगडे, गीता गवळी, आनंद परांजपे, रमाकांत म्हात्रे या राजकारण्यांनी उत्सव रद्द केला आहे. शिवाय, दादर सेनाभवन येथील लोकप्रिय दहीहंडी उत्सवही यंदा रद्द करण्यात आला आहे. तर राम कदम यांनी दुष्काळाचे कारण देत यंदाचा उत्सव रद्द करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. तसेच नवी मुंबईतील नामदेव भगत चॅरिटेबल ट्रस्ट, कर्ण मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, घणसोली मित्र मंडळ आणि वन वैभव कला क्रीडा निकेतन या सर्व आयोजकांनी यंदाचा उत्सव रद्द केला आहे. ठाण्यातील ‘संस्कृती’ प्रतिष्ठानचे प्रताप सरनाईक यांनी गेल्याच वर्षी अत्यंत साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला होता.
‘संघर्ष’ प्रतिष्ठानच्या आव्हाड यांनी उत्सव रद्द केल्यानंतर जणू आयोजकांनी माघार घेण्याचा ‘सिलसिला’ सुरूच ठेवला आहे. मात्र या माघार घेण्यामागे आयोजकांनी कारणे वेगवेगळी सांगितली आहेत. आयोजकांनी कुठलीच चर्चा न करता आयोजन रद्द करण्याचा शिरस्ता सुरू केल्याने उत्सव कसा साजरा करायचा, असा प्रश्न दहीहंडी समन्वय समितीने उपस्थित केला आहे.
छोट्या आयोजकांत घबराट
दहीहंडी उत्सवातील लाखमोलाच्या हंड्या लावणाऱ्या बड्या आयोजकांनीच माघार घेतल्याने छोट्या आयोजकांनी याची धास्ती घेतली आहे. ऐन उत्सवाच्या दिवशी काही घडलेच तर मोठे आयोजक त्यातून सुखरूप बाहेर पडू शकतात; मात्र विभागीय आणि स्थानिक आयोजकांवर कारवाई झाल्यास त्यांना तारणहार नाही, या विचारांनी छोट्या आयोजकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
70% सराव शिबिरे विनापरवानगी!
नारळीपौर्णिमेच्या दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘चोर गोविंदा’च्या उत्सवाची परंपराही लोकप्रिय आहे. मात्र यंदा उत्सवावरील वादामुळे पोलिसांनी आयोजकांना परवानगी नाकारल्याने शनिवारी आयोजित करण्यात येणारी ७० टक्के सराव शिबिरे विनापरवानगी साजरी केली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
संभ्रमामुळे झोप उडाली
दहीहंडी उत्सवाबद्दल न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही राज्य शासनाकडून गोविंदा पथकांची कोंडी होते आहे. गेले कित्येक दिवस यंत्रणांच्या चौकटीत अडकल्याने या संभ्रमामुळे गोविंदाची झोप उडाली आहे. आता उत्सवाला केवळ १० दिवस शिल्लक राहिले असून, प्रत्येक क्षण आमच्यासाठी निर्णायक आहे, असे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर म्हणाले.