भाजपाच्या मेळाव्यासाठी रेल्वेच्या विशेष १७ गाड्या, मुंबईत स्थापना दिवसाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 04:37 PM2018-04-04T16:37:42+5:302018-04-04T16:37:42+5:30
भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित होता यावे, यासाठी विशेष १७ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
- गणेश वासनिक
अमरावती : भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिवस असून, त्यानिमित्त मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्थित बीकेसी मैदानावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना या मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित होता यावे, यासाठी विशेष १७ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्यासह केंद्रीय मंत्री, कॅबिनेट व राज्यमंत्री, खासदार, आमदार आदींची उपस्थिती राहणार आहे. पुढील वर्षी अथवा डिसेंबरअखेर लोकसभा निवडणूक होण्याचे संकेत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहे. तसेच येत्या वर्षी विधानसभा निवडणुकीचे बिगूलदेखील वाजणार आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने स्थापना दिवसाचे औचित्य साधून भव्यदिव्य प्रमाणात मेळाव्याचे आयोजनामागे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. तसेही काही महिन्यांपासून शिवसेनेसोबत राजकीय वितुष्ट आल्यामुळे स्थापना दिवशी मेळाव्याच्या माध्यमातून भाजपाचे मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याची रणनिती आखली आहे. गाव, खेडी, शहर, महानगरातून भाजपच्या स्थापना दिवशी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यात भाजपाजनांनी मोठ्या संख्यने उपस्थिती दर्शवावी, यासाठी जिल्हा, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी या मेळाव्याचे ‘मार्केटिंग’ करीत असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भव्यदिव्य प्रमाणात स्थापना दिवसाचे आयोजन करीत असल्याचे वास्तव आहे. हा मेळावा म्हणजे विधानसभा, लोकसभा निवडणूक पूर्वीचे शक्तीप्रदर्शन असल्याचे मानले जात आहे. येत्या निवडणुका स्वळावर अथवा मित्रपक्षांना सोबत घेऊन लढवाव्यात, याचेही चिंतन, मंथन भाजपाचे नेते करणार आहे. त्यामुळे भाजपा स्थापना दिवशी मुंबई आयोजित मेळाव्यात कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महत्वाच्या रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे ये-जा करण्यासाठी विशेष १७ रेल्वे गाड्या उपलब्ध केल्या आहेत. १७ ते १८ डब्यांची एक रेल्वे गाडी असणार असून, ५ व ६ एप्रिल या दोन दिवशी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. मुंबई मध्य रेल्वे विभागाचे आॅपरेटींग शाखेकडून महाप्रबंधक ब्रजेश राय यांनी ३१ मार्च २०१८ रोजी विशेष रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या रेल्वे स्थानकावरून सुटतील गाड्या
मुंबई येथील भाजपाच्या स्थापना दिवशी राज्याच्या कानाकोप-यातून कार्यकर्त्यांना ये-जा करता यावे, यासाठी ५ व ६ एप्रिल रोजी विशेष १७ रेल्वे गाड्या सुटणार आहे. यात उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, शेगाव, मिरज, सोलापूर, भुसावळ, जळगाव, अजनी, नागपूर, बल्लारशा, वर्धा, नया अमरावती, अमरावती मॉडेल स्टेशन, अकोला, नांदगाव (मनमाड) या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
‘‘ मुंबईच्या बांद्रा येथील बीकेसी मैदानावर ६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या भाजपाचा स्थापना दिवस भव्यदिव्यतेने साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. नेत्यांचे मार्गदर्शन आणि येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी हा मेळावा महत्वाचा ठरणारा आहे.
- शिवराय कुळकर्णी,
प्रदेश प्रवक्ते, भाजपा