अवयव तस्करी गुन्हा दाखल
By admin | Published: December 12, 2015 02:36 AM2015-12-12T02:36:14+5:302015-12-12T02:36:14+5:30
किडनी रॅकेटप्रकरणी अखेर शुक्रवारी मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय, तांत्रिक बाजू तपासण्यास, पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे
अकोला : किडनी रॅकेटप्रकरणी अखेर शुक्रवारी मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय, तांत्रिक बाजू तपासण्यास, पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मदत होणार आहे. आरोपी देवेंद्र शिरसाटच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्याचा साथीदार आनंद जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये संतोष गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आनंद जाधव, देवेंद्र शिरसाट व किडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून, तीनही आरोपींच्या चौकशीतून समोर आलेले पुरावे व काही दस्तावेजांवरून अवयव तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजी कोळी, आनंद जाधव व देवेंद्र शिरसाटवर मानवी अवयव तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अवयव प्रत्यारोपण करणारे डॉक्टरही लवकरच जाळ््यात सापडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
शिक्षेची तरतूद
कलम ३७० अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीस ७ ते १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. एवढेच नव्हे तर एकापेक्षा अधिक व्यक्तींचे अवयव किंवा मानवी तस्करीच्या प्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूदही आहे.
सहमती पत्र बनावट
पीडित संतोष कोल्हटकर यांची किडनी दान करण्यासाठी तयार केलेले त्यांच्या पत्नीचे सहमती पत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्यासोबत जोडलेले सर्व दस्तावेजही बोगस आहेत.
शिवाजी कोळी
सांगलीला रवाना
सूत्रधार शिक्षक शिवाजी कोळीला घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी सांगलीला रवाना झाले.
त्याच्या घराची झाडाझडती घेणार आहे. सांगलीत हे पथक दोन दिवस थांबेल.
विनोद पवारच्या
घराची झडती
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी विनोद पवारच्या मांडवा येथील घराची झडती घेण्यासाठी खदान पोलिसांचे पथक शुक्रवारी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत विनोदच्या घराची झडती सुरू होती.