आॅस्कर गुंतवणूकदारांचा मोर्चा
By Admin | Published: August 23, 2016 02:59 AM2016-08-23T02:59:23+5:302016-08-23T02:59:23+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई जलदगतीने व्हावी यासाठी सोेमवारी (२२ आॅगस्ट) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा कढण्यात आला
महाड/बिरवाडी : आॅस्कर मॅनेजमेंट प्रा.लि. या कंपनीने महाड, पोलादपूर, गोरेगाव, अलिबाग, पुणे येथे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात कारवाई जलदगतीने व्हावी यासाठी सोेमवारी (२२ आॅगस्ट) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा कढण्यात आला होता.
आॅस्कर मॅनेजमेंट कंपनीव्दारे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. ठरावीक कालावधीत परतावा न मिळाल्याने रायगड जिल्ह्यातील महाड, बिरवाडी, गोरेगाव, अलिबागसह पुणे येथील आॅस्कर कंपनीने गोरगरीब १२ हजार गुंतवणूकदारांची १५ कोटी रु पयांना फसवून पलायन केले असून शाखा व्यवस्थापकांना अटक करण्यासाठी गुंतवणुकदार रस्त्यावर उतरले आहेत. आॅस्कर पीडित ग्राहकांनी प्रांतकार्यालयावर मोर्चा काढून गोरगरीब जनतेचे पैसे परत करून गोरगरिबांना न्याय देण्याची मागणी केली. याचबरोबर आॅस्कर मॅनेजमेंट या कंपनीकडून आपली फसवणूक झाली आहे व आपले कष्टाचे ६ लाख रूपये बुडीत गेले आहेत, अशी माहिती आॅस्कर मॅनेजमेंटचे गुंतवणूकदार लक्ष्मण सखाराम कदम यांना कळताच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २५ जुलै रोजी घडली आहे. या मृत्यूप्रकरणी बिरवाडी येथील शाखा व्यवस्थापक दिनेश पवार व संपत झांजे यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांचा मुलगा संजय कदम यांनी केली आहे.
महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे हे पूर्व नियोजित कामाकरिता महाडबाहेर गेले असल्याने मोर्चेकऱ्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांचे शिरस्तेदार नायब तहसीलदार सुभाष जगदाळे यांनी स्वीकारत तुमचे निवेदन शासनापर्यंत पोहचवून योग्य तो पाठपुरावा करून दोषींविरोधात कारवाई होईल असे आश्वासन दिले. हे निवेदन देताना प्रभाती स्वाई, दीपक स्वाई, संजय कदम, शिंदे आदिंसह आॅस्कर पीडित ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)