ओशिवरा स्थानक डिसेंबरपासून सुरू
By admin | Published: May 16, 2016 02:41 AM2016-05-16T02:41:12+5:302016-05-16T02:41:12+5:30
गोरेगावकरांच्या प्रतीक्षेत असलेले जोगेश्वरी आणि गोरेगावमधील ओशिवरा हे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील नवीन रेल्वे स्थानक येत्या डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे
मुंबई: गेली अनेक वर्षे गोरेगावकरांच्या प्रतीक्षेत असलेले जोगेश्वरी आणि गोरेगावमधील ओशिवरा हे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील नवीन रेल्वे स्थानक येत्या डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे गोरेगाव रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वेचा गोरेगांवपर्यंत लवकर विस्तारीकरण होण्यासाठी, तसेच गोरेगावला आदर्श रेल्वे स्थानक बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही देसाई यांनी या भेटीवेळी दिले.
या कामी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. सुमारे दीड तास गोरेगाव रेल्वे स्थानकावरील हार्बर रेल्वेच्या कामांची पाहणी आणि गोरेगावकरांना भेडसावत असलेल्या रेल्वे समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांनी गोरेगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. या वेळी मुंबई पश्चिम रेल्वेचे विभागीय अधिकारी मुकुल जैन, अंधेरी ते गोरेगांव हार्बर रेल्वे प्रकल्प अधिकारी खुराणा, पश्चिम रेल्वेचे सहायक अधिकारी शैलेंद्र, गोरेगावचे स्टेशन मास्टर चोरगे, पी (दक्षिण) विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा लोचना चव्हाण, उपविभागप्रमुख शशांक कामत व दीपक सुर्वे, महिला उपविभाग संघटक सुमंगल कोलथलकर, नगरसेवक राजू पाध्ये, नगरसेविका प्रमिला शिंदे, नगरसेविका वर्षा टेंबवलकर, शिवसेना व्यापारी संघटनेचे विरेंद्र लिबाचिया, रेल्वे प्रवासी संघटनेचे विष्णू अगरवाल आणि गोरेगावकर नागरिकांची या वेळी उपस्थिती होती.
गोरगाव रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बैठकीत मुकुल जैन यांनी गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे विस्तारीकरणात १० ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्या आणि जागेचे मालक यांच्याबरोबर रेल्वेला जागा हस्तांतरणाचा प्रश्नाचा तिढा अडकल्याचे सांगितले. या प्रकरणी आपण एमएमआरडीए आणि संबंधित सोसायट्या आणि जागेच्या मालकांबरोबर बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे देसाई म्हणाले. गोरेगाव (प) बेस्टची संरक्षक भिंतीचा येथील पादचारी पुलाला अडथळा होत आहे. बेस्टकडून जागेची एनओसी रेल्वे प्रशासनाला मिळत नसल्याची माहिती जैन यांनी या वेळी दिली. याबाबतीत लवकरच बेस्ट प्रशासनाबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासनही उद्योगमंत्र्यांनी या वेळी दिले.
पावसाळा जवळ आल्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील नाले लवकर साफ करावेत, तसेच स्वछता राखण्यात यावी, याकडे देसाई यांनी लक्ष वेधून या प्रकरणी शिवसेनेचे येथील नगरसेवक आणि पालिका प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. गोरेगावच्या नवीन रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा लवकरच बदलेल, असा विश्वास देसाई यांनी या वेळी व्यक्त केला.