उस्मानाबादमध्ये सात व आठ महिन्यांच्या बालकांची कोरोनावर यशस्वीपणे मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:07 AM2021-06-02T09:07:37+5:302021-06-02T09:08:31+5:30
कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
कळंब (जि.उस्मानाबाद) : मागच्या दहा दिवसांत कळंब येथील कोविड सेंटरमध्ये एकूण वीस बालके उपचार घेत होती. यापैकी १२ बालकांना डिस्चार्ज देण्यात आला असून आठ बालकांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी दोन चिमुरड्यांचे वय तर अवघे सात अन् आठ महिने आहे.
मागच्या दहा दिवसात मोहेकर हॉस्टेल, आयटीआय कोविड सेंटर येथे वेगवेगळ्या वयोगटांतील एकूण वीस बालके उपचार घेत होती. त्यात एका ‘स्पेशल चाइल्ड’चाही समावेश आहे. या सर्वांची उपजिल्हा रुग्णालयाने योग्यरित्या लक्ष ठेवत विशेष अशी काळजी घेतली आहे. मागच्या दहा दिवसांपूर्वी बोरगाव ध. येथील दोन कुटुंबांच्या कोविड टेस्ट झाल्या होत्या. यावेळी पॉझिटिव्ह आलेल्या पालकांसोबत एक आठ महिन्यांचा मुलगा तर सात महिन्यांची मुलगी मोहेकर हॉस्टेल येथील कोविड सेंटरला दाखल झाले होते. यातील एकाचे माता-पिता तर दुसऱ्याची आई पॉझिटिव्ह होती. यामुळे या
आईच्या दुधावर असलेल्या बालकांना कोविड सेंटरला मुक्काम करावा लागला. त्यांच्यावर डॉ. लोंढे, डॉ. जगताप यांनी विशेष फोकस करून उपचार केले. त्यामुळे सोमवारी कोरोनामुक्त होत या दोन्ही बालकांनी सुखरूप घर गाठले.
आयटीआयवर बालकांसाठी विशेष कक्ष
आयटीआय कोविड सेंटर येथे बालकांसाठी तीस बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे प्रमुख म्हणून डॉ. अभिजित लोंढे यांची नियुक्ती केली असल्याचे डॉ. जीवन वायदंडे यांनी सांगितले. याशिवाय सध्या चार कक्षात बालकांची सोय केली असून, तेथे सहा बालके उपचार घेत असल्याचे डॉ. रुपेश चव्हाण यांनी सांगितले.