इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 01:52 PM2024-06-05T13:52:58+5:302024-06-05T13:54:47+5:30
Hemant Godse on Nashik Lost: उध्दव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा दारुण पराभव केला आहे. यावर गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे पराभवाचे खापर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फोडले आहे.
ज्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रणकंदन माजले होते त्या नाशिकमध्ये अखेर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला आहे. उध्दव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा दारुण पराभव केला आहे. यावर गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे पराभवाचे खापर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फोडले आहे.
लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता. उमेदवारी उशीरा जाहीर झाल्याने त्याचा इम्पॅक्ट झाला आहे, असे गोडसे म्हणाले. अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या धोरणामुळे काही प्रमाणात नाराजी ग्रामीण भागात होती. संपूर्ण राज्यात याची अनुभूती दिसली आहे. लवकर उमेदवारी जाहीर झाली असती तर निकाल वेगळा असता, अशी खंत गोडसे यांनी व्यक्त केली.
उमेदवारीला उशीर होत असल्याने अनेक जण समोरच्या उमेदवार सोबत गेले. इतर स्पर्धक आल्याने मला उमेदवारी देण्यात उशीर झाला. समोरच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर जवळपास १ महिन्यानंतर मला उमेदवारी मिळाली. निवडणुकीत कोणी काम केले, कोणी नाही हे जनतेला माहिती आहे, असे वक्तव्य गोडसे यांनी भुजबळांचे नाव न घेता केले आहे.