इतर मंत्री होतील का ‘शहा’णे?

By admin | Published: June 5, 2016 12:33 AM2016-06-05T00:33:58+5:302016-06-05T00:33:58+5:30

‘माझ्या कानावर काही मंत्र्यांबाबत काही तक्रारी येत आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या. पक्षाची, या सरकारची बदनामी होईल, असे वागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

Other ministers will be 'Shahaane'? | इतर मंत्री होतील का ‘शहा’णे?

इतर मंत्री होतील का ‘शहा’णे?

Next

- यदु जोशी, मुंबई

‘माझ्या कानावर काही मंत्र्यांबाबत काही तक्रारी येत आहेत. सगळ्यांनी काळजी घ्या. पक्षाची, या सरकारची बदनामी होईल, असे वागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मे २०१५ मध्ये कोल्हापुरात सतर्क केले होते. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने आता इतर मंत्री तरी ‘शहा’णे होतील का, असा सवाल एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने समोर आला आहे.
‘पक्ष कार्यासाठी मंत्र्यांना वर पैसे पोहोचवावे लागतात’ अशी पद्धत आपल्या पक्षात नाही. ही काही काँग्रेस नाही. त्यामुळे पक्षाला द्यावे लागतात, या सबबीखाली कोणी पैसा जमा करण्याची काहीही गरज नाही. पक्ष त्यासाठी समर्थ आहे. आपल्याला पारदर्शक कारभार करायचा आहे. तेच आपल्या कामाचे मूख्य सूत्र असले पाहिजे, असेही शहा यांनी सुनावले होते. चिक्की प्रकरण त्या वेळी ताजे होते. भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या अपेक्षांची ही दिशा महाराष्ट्रातील मंत्र्यांना फारशी समजली नाही, असे आता दिसते. अर्धा डझन मंत्री या ना त्या निमित्ताने वादात अडकले.
अंतस्थ गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राज्यातील कोणत्या मंत्र्याचे काय-काय चालले आहे, याचा इत्थंभूत ‘फीड बॅक’ नियमितपणे अमित शहा यांना मिळत असतो. तशी यंत्रणाच त्यांनी गुप्तपणे उभारली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत:ची पारदर्शक प्रतिमा टिकवून ठेवण्याबाबत नेहमीच अतिशय सावध आणि संवेदनशील असतात. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याचा दावा करून, कोणी तुमच्याकडून नियमबाह्य कामे करवून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याला बाहेरचा रस्ता तर दाखवाच, पण अशा प्रकाराची माहिती तत्काळ मला द्या, असे तोंडी आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

गुप्तवार्ता विभागाची नजर
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री कार्यालयांमधील पीए, पीएस यांच्या हालचालींवर गुप्तवार्ता विभागाची नजर असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी गुप्तवार्ता विभागाच्या एका ज्येष्ठ महिला अधिकाऱ्याने दोन पीएंना बोलावून घेतले, त्यांची चौकशी केली. त्यांच्याबद्दल असलेल्या तक्रारीही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. तेव्हापासून ते पीए सुधारले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


झाली होती चाचपणी!
खडसे भाजपातून बाहेर पडलेच, तर त्यांच्यासोबत कोणी बाहेर पडेल का, त्यांनी राजीनामा दिला तर उमटणारी संभाव्य प्रतिक्रिया काय असेल, याबद्दल भाजपाकडून आधीच चाचपणी करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे खासदार, आमदार यांची मते जाणून घेण्यात आली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित मानले गेले होते. खडसे पक्षातून बाहेर पडण्याची चूक करणार नाहीत आणि समजा त्यांनी उद्या तसे केले, तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असे त्यांचे समर्थक म्हणविणाऱ्यांनी पक्षाला सांगितले होते, अशीही माहिती आहे.

Web Title: Other ministers will be 'Shahaane'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.