मंजुळा हत्येत कारागृहातील अन्य अधिकारीही सहभागी
By admin | Published: July 8, 2017 04:39 AM2017-07-08T04:39:01+5:302017-07-08T04:39:01+5:30
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात सहा आरोपींसह कारागृहातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात सहा आरोपींसह कारागृहातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सहाही आरोपींच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
या आरोपींची कोठडी वाढविण्यासाठी त्यांना किल्ला कोर्टातील अतिरिक्त महादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात आरोपींनी अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सीसीटीव्ही फुटेजबाबत फॉरेन्सिक लॅबकडून आलेल्या अहवालातही या आरोपींसह अन्य अधिकाऱ्यांच्या आक्षेपार्ह हालचाली आढळून आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या हत्याकांडात सहा आरोपींबरोबरच कारागृहातील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची दाट शक्यता प्रभा राऊळ यांनी महादंडाधिकाऱ्यांसमोर वर्तविली. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेलर मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या सहाही जणी मंजुळाचे केस ओढून तिला मारहाण करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या हातात काठीही दिसून आली. या काठीच्या शोधासाठी आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली; मात्र ती तिथे सापडली नाही. त्यातच अटक केलेल्या आरोपींना कायद्याचे ज्ञान असल्याने त्या तपासात सहकार्य करत नाहीत, तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी न्यायालयात सांगितले.
अतिरिक्त महादंडाधिकारी आर.एस. अराध्ये यांच्यासमोर सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी शुक्रवारी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागितली. या प्रकरणातील सहाही आरोपींच्या गुन्ह्यांचा सहभाग नेमका काय आहे? तिला मरेपर्यंत मारण्याचा नेमका हेतू काय आहे, त्याचा तपास सुरू आहे. तसेच कारागृहातील २९१ कैद्यांचे जबाब नोंदविणेही बाकी असून त्यांच्याकडे चौकशी करणे जिकिरीचे काम असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
तथापि, आरोपींचे जबाब नोंदवून झाले आहेत. फक्त एका ‘काठी’च्या शोधासाठी त्यांच्या कोठडीत वाढ न करता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी आरोपींचे वकील पंकज बाफना यांनी केली. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर महादंडाधिकारी अराध्ये यांनी आरोपींना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्वाती साठेंची माघार...
कारागृहाच्या वतीने मंजुळा शेट्ये प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या व्हॉट्सअॅपवरील मजकुराने आरोपींना केलेल्या सहकार्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. ‘आरोपी जेलकर्मी आपल्या भगिनी आहेत. त्यांना वाचवायला हवे,’ असा मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या तपासावर संशय व्यक्त करण्यात आला.
कारवाईचा बडगा उगारला जाण्याच्या शक्यतेने त्यांनी शुक्रवारी स्वत:हून या प्रकरणातून माघार घेतली. त्यांनी कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक बी.के. उपाध्याय यांच्याकडे आपल्यावर होत असलेल्या आरोपांमुळे माझ्याकडे तपास देणे योग्य नसल्याचे सांगितले. तसेच तपास काढून घेण्याची मागणी केली. त्यांच्या अर्जावरून हा तपास तुरुंग महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.