जिल्हा परिषदांमध्ये अन्य पक्ष नगण्यच!

By admin | Published: February 14, 2017 12:59 AM2017-02-14T00:59:09+5:302017-02-14T00:59:09+5:30

महाराष्ट्राचे राजकारण अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी व्यापून

The other party is negligible at the Zilla Parishad! | जिल्हा परिषदांमध्ये अन्य पक्ष नगण्यच!

जिल्हा परिषदांमध्ये अन्य पक्ष नगण्यच!

Next

महाराष्ट्राचे राजकारण अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी व्यापून टाकले आहे. एके काळी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राज्यभर दबदबा असणारा शेतकरी कामगार पक्ष केवळ रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका घेऊ शकतो. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जनसुराज्य पक्ष या दोनच पक्षांची नोंद घेण्याजोगी ताकद आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या लढत आहेत, पण एकाही जिल्ह्यात बहुमताने सत्तेवर येईल, अशी इतर पक्षांची परिस्थिती नाही.
गत निवडणुकीतील पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणूक निकालावर नजर टाकली, तर असे दिसते की, ६३ अपक्ष सदस्यांसह अनेक पक्षांनी एकूण १८८ जागा जिंकल्या होत्या. अपक्षांनी जिंकलेल्या जागा सर्वाधिक गडचिरोलीत (सदस्य संख्या १०) होत्या. सहा जिल्हा परिषदांमध्ये एकही अपक्ष निवडून आला नव्हता. उर्वरित ठिकाणी दोन-चार अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. राज्यातील अन्य पक्षांनी विजय नोंदविला होता. त्यामध्ये (कंसात त्यांनी जिंकलेल्या जागा) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (१७), शेतकरी कामगार पक्ष (२३), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (१), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (५), बहुजन समाज पक्ष (३), स्वाभिमानी शेतकरी संघटना (६), जनसुराज्य शक्ती पक्ष (६), शिवसंग्राम (१), लोकभारती (७) अशी संख्या आहे. काही स्थानिक आघाड्या किंवा संघटना होत्या. त्यांनी ठिकठिकाणी काही जागा पटकावल्या होत्या. चंद्रपूरमध्ये युवाशक्ती संघटनेने (५), साताऱ्यात पाटण विकास आघाडी (३), चंद्रपुरात शेतकरी संघटना (२), सोलापुरात स्थानिक आघाड्या (१२) अशांचा समावेश आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वांत चांगले यश औरंगाबादमध्ये होते. तेथे या पक्षाने आठ जागा जिंकल्या होत्या. नाशिक, पुणे, जालना, लातूर, बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर या सात जिल्हा परिषदेत एक-दोन सदस्यच निवडून आले होते. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात दुसरे स्थान मिळाले होते. या पक्षाने ६२ पैकी १९ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने वीस जागा पटकावल्या होत्या. सोलापुरात तीन आणि परभणीत एक अशा अन्य दोनच ठिकाणी चार जागा या पक्षाला मिळाल्या होत्या. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय रिपब्लिकन पक्षाला केवळ बुलडाण्यात चार जागा मिळाल्या. (या पक्षाची अकोला जिल्हा परिषदेत सत्ता आहे; पण तेथे आता निवडणूक नाही.) परभणी जिल्हा परिषदेत सीताराम घनदाट यांना मानणाऱ्या घनदाट मित्रमंडळास तीन जागा मिळाल्या होत्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात जनता पक्षाची एके काळी ताकद होती. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने ९९ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून स्थान निर्माण केले होते. दिवंगत नेते राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील या पक्षात जनता लाटेत समाजवादी, जनसंघ आणि संघटना काँग्रेसचे लोक एकत्र आले होते. जनता पक्षाच्या फुटीनंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. संघटना काँग्रेसचे नेते पुन्हा मूळ काँग्रेस पक्षात सामील झाले. समाजवादी विचारांच्या गटाने पुढे जनता दलाची स्थापना केली. या पक्षाचे दहा ते पंधरा आमदार निवडून यायचे. या पक्षाची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. समाजवादी किंवा प्रजा समाजवादी पक्षांचे अस्तित्वच संपले आहे. जिल्हा परिषदांमध्ये या पक्षाचे सदस्य नाहीत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपालिकेत या पक्षाने बहुमत आणि नगराध्यक्षपद पटकाविले, एवढेच मर्यादित यश आहे.
चालू वर्षी होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन-तीन जिल्ह्यांत इतर पक्षांची भूमिका निर्णायक ठरेल, त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचा समावेश आहे. अन्यथा इतर पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांचे यश केवळ एक आकडीच असेल. या पंचवीस जिल्हा परिषदांमध्ये गत निवडणुकीत एकूण १,५१६ सदस्य होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ५११ जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला होता. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर ४१९, शिवसेना तिसऱ्या स्थानावर २३३ आणि भारतीय जनता पक्ष १६५ जागा जिंकून चौथ्या स्थानावर होता. इतर पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांना १२५ जागा मिळाल्या होत्या. त्यात मनसे आणि शेकापचा समावेश आहे. अपक्षांनी ६३ जागा पटकावल्या होत्या. वसंत भोसले

Web Title: The other party is negligible at the Zilla Parishad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.