अन्य दोन मुलींच्याही लग्नाचा होता घाट?
By admin | Published: May 8, 2017 04:57 AM2017-05-08T04:57:33+5:302017-05-08T04:57:33+5:30
माहीममध्ये गरिबीला कंटाळून १३ वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिल्याच्या घटनेने सर्वांनाच हेलावून सोडले. या मुलीपाठोपाठ तिची
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहीममध्ये गरिबीला कंटाळून १३ वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिल्याच्या घटनेने सर्वांनाच हेलावून सोडले. या मुलीपाठोपाठ तिची आई अन्य दोन बहिणींच्याही लग्नाचा घाट घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी माहीम पोलीस अधिक तपास करत आहेत.
माहीम येथील नयानगर परिसरात १३ वर्षांची नेहा आई आणि दोन बहिणीसोबत राहते. नेहा घरात मोठी आहे. अन्य दोन बहिणी तिच्यापेक्षा लहान आहेत. परिस्थितीमुळे नेहाचे ४० वर्षांच्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत आईने बळजबरीने विवाह लावून दिला. नेहाने पतीच्या शारीरिक अत्याचाराला कंटाळून घर सोडले आणि शुक्रवारी रात्री पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यात तिच्या चौकशीत नेहापाठोपाठ तिच्या अन्य दोन बहिणींचे तिची आई लग्न जुळवून देणार होती, अशी माहिती समोर येत आहे.
परिस्थितीमुळे तीन मुलींचा सांभाळ करणे, तिला शक्य होत नव्हते. यातूनच तिने हा निर्णय घेतल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली. बालविवाह, पॉक्सो, लैंगिक अत्याचार, मारहाणीच्या गुन्ह्यांत ३५ वर्षांच्या आईसह पती आसीफ आयुब खान (३८) आणि लग्न लावून देणारा अहमद राजम मोहम्मद शेख (३८) या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ८ मेपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या तिघांकडेही पोलीस कसून चौकशी करत आहेत. सोमवारी त्यांच्या वाढीव कोठडीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.