दुसर्या व्हिडीओने टोइंग प्रकरणाला नवे वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:01 AM2017-11-13T03:01:08+5:302017-11-13T07:46:28+5:30
मालाड येथे एक महिला तान्ह्या बाळासह कारमध्ये बसलेली असतानाच पोलिसांनी कार ‘टो’ केल्यामुळे वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या टोइंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड येथे एक महिला तान्ह्या बाळासह कारमध्ये बसलेली असतानाच पोलिसांनी कार ‘टो’ केल्यामुळे वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, या टोइंग प्रकरणात आता नवा व्हिडीओ समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. नव्या व्हिडीओनुसार टोइंगची कारवाई टाळण्यासाठी गाडी मालकाने आपल्या पत्नीच्या साथीने बनाव रचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील व्हिडीओची सत्यता न तपासताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे आमची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाल्याची भावना वाहतूक पोलीस व्यक्त करीत आहेत.
मालाड येथील टोइंग प्रकरणात रविवारी नवा व्हिडीओ समोर आला. यात निलंबित पोलीस कर्मचारी शशांक राणे यांनी ‘नो पार्किंग’मध्ये थांबलेली कार टो करण्याचे निर्देश दिले तेव्हा गाडीत कोणीही बसलेले नव्हते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा कार ‘टो’ करण्यासाठी क्रेनला जोडली जात असताना कारमालक युवराज माळी आणिं त्याची पत्नी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पोलीस कारवाईला विरोध केला. वाहतूक पोलिसांनी नियमानुसार कारवाई करत स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला होता. कारवाई सुरू झाली तेव्हा कारमध्ये कोणीही नसल्याचे शंशाक राणे यांच्या सहकार्याने चित्रित केलेल्या व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. कारमालक पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे कर्तव्य बजावणार्या कर्मचार्यांवर कारवाई होत असल्यामुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे.
चौकशीनंतर बोलणार
शनिवारी समोर आलेल्या व्हिडीओनुसार संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दुसर्या व्हिडीओबाबत २ ते ३ दिवसांत चौकशीअंती अहवाल सादर करण्यात येणार आहे. चौकशी अहवालानंतर या विषयावर भाष्य करणार आहे.
- अमितेश कुमार, सहआयुक्त, वाहतूक पोलीस