‘इतरांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा’
By admin | Published: May 25, 2017 01:50 AM2017-05-25T01:50:38+5:302017-05-25T01:50:38+5:30
‘सामाजिक न्याय’ विभागाला घटनेच्या आधारे मोठा निधी मिळतो. तो सर्वसामान्यांपर्यंत जावा, अशी अपेक्षा आहे. मात्र तो काहीजणांकडेच फिरतो आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘सामाजिक न्याय’ विभागाला घटनेच्या आधारे मोठा निधी मिळतो. तो सर्वसामान्यांपर्यंत जावा, अशी अपेक्षा आहे. मात्र तो काहीजणांकडेच फिरतो आहे; म्हणूनच ज्यांनी योजनांचा याआधी लाभ घेतला आहे, त्यांनी इतरांना तो लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारांचे वितरण बुधवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सहा संस्थांना आणि १२५ जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मंत्री पाटील म्हणाले, समाजातील स्थिती पाहता आम्ही जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत होतो, तेव्हा आमच्या हयातीत परिवर्तन होईल असे वाटत नव्हते.
मात्र आता चांगली नोकरी, लठ्ठ पगार सोडून अनेकजण इतरांच्या विकासासाठीही काम करताना दिसत आहेत. अनेक व्यक्ती आणि संस्था त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. त्यामुळे आशावादी चित्र निर्माण झाले आहे.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी जातिव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रयत्न केले. हाच विकासाच्या विचारांचा धागा पकडून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काम सुरू असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचेही भाषण झाले.