‘...अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही’
By admin | Published: July 10, 2017 05:18 AM2017-07-10T05:18:24+5:302017-07-10T05:18:24+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची पूर्तता न केल्यास पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
दोनशे आमदारांचा पाठिंबा असलेले राज्यातील सध्याचे सरकार मजबूत वाटत असले तरी ते दुबळे आहे. सत्तेत राहूनही सरकारच्या निर्णयावर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. नेहमी राजकीय भूकंपाच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेकडून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. शिवसेनेचा हा डाव जनतेला आता कळला असल्याचे अजित पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आघाडी सरकारच्या मंत्र्यांपेक्षा भाजपाचे मंत्री जवळचे वाटतात, असे वक्तव्य शिर्डी येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता विखे-पाटील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची भूमिका बजावत आहेत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.