...अन्यथा 'ते'आमच्या नाटक कंपनीतलेच एक पात्र ठरतील; फडणवीसांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 02:57 PM2021-01-06T14:57:17+5:302021-01-06T14:58:00+5:30
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करणे हा मुद्दाच मुळात वादाचा नाही...
पुणे : औरंगाबाद नामांतराचा मुद्दा भाजपने चांगलाच उचलून धरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरून राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. आणि दोन महिन्यानंतर होणाऱ्या औरंगाबाद महापालिका निवडणुक देखील नामांतराच्या मुद्द्याभोवतीच फिरण्याची दाट शक्यता देखील आहे. त्याच भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून हाच मुद्दा घेऊन शिवसेनेवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहे. त्यात भर म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला नाटक कंपनी म्हणत डिवचले होते. त्याला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
पुण्यात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख देखील असून महाविकास आघाडीतील घटक आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना विश्वासात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय ते नक्की घेतील. मात्र काही लोक नामांतराच्या मुद्द्याचा वापर करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर करणे हा मुद्दाच मुळात वादाचा नाही. आणि शिवसेनेने याआधीच संभाजीनगर नावाचा प्रस्ताव ठेवलेला आहे.
माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा नाटक कंपनी असा उल्लेख करत टीकेला नीलम गोऱ्हे यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, सत्ताधारी पक्षावर टीका करणे हे विरोधी पक्षाचे कामच असते. त्यांनी टीका केली नाही तर ते आमच्याच नाटक कंपनीतले एक पात्र समजले जातील. आम्ही नाटक कंपनी असलो तरी ते प्रेक्षकांची भूमिका चांगली निभावत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रधर्माचे पालन करत आमच्यावर टीका करत राहावी.आम्ही आमचे काम करत राहणार आहोत.
पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नामकरण देखील पुण्याच्या नागरिकांनी आनंदाने स्वीकारले होते. पण सध्या मी विधान परिषदेची उपसभापती पदावर कार्यरत असल्याने पुण्याबाबत कुठलीही ठाम भूमिका घेणे शक्य होणार नाही, असेही गोऱ्हे यावेळी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून शिवसेनेचा 'नाटक कंपनी' उल्लेख...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत आहे. मुंबई महापालिका निवडणूक आल्यानं त्यांना गुजराती समाजाची आठवण झाली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आल्यानं त्यांना संभाजी महाराजांची आठवण होऊ लागली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेचा उल्लेख नाटक कंपनी असा केला होता..