...अन्यथा कबड्डी टाइमपास खेळ राहील
By Admin | Published: July 10, 2015 10:41 PM2015-07-10T22:41:26+5:302015-07-11T00:11:26+5:30
प्रशिक्षक बलवीरसिंग : कबड्डीच्या नियमांत बदल करणे आवश्यक
सचिन भोसले -कोल्हापूर -कबड्डीत चढाई करणारा खेळाडू प्रतिस्पर्धाच्या क्षेत्रात खेळाडूंना बाद करण्यासाठी प्रयत्न करीत नाही. नेमकी हीच बाब प्रेक्षकांना रुचत नाही. यासाठी दोन वेळा चढाई केल्यानंतर तिसऱ्या वेळी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबरोबर चढाई करणारा भिडलाच पाहिजे; अन्यथा कबड्डी हा टाइमपास खेळ होऊन जाईल. यासाठी कबड्डीच्या नियमांत आमूलाग्र बदल करणे आवश्यक असल्याचे मत भारतीय कबड्डी संघाचे व पंजाब वीज संघाचे प्रशिक्षक बलवीरसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
४० व्या अखिल भारतीय वीज मंडळ कबड्डी स्पर्धेसाठी ते पंजाब वीज संघाचे प्रशिक्षक म्हणून आले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशातील कबड्डीवर पंजाबच्या खेळाडूंचा बोलबाला जादा आहे; कारण पंजाब सरकारने केवळ कबड्डीसाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. यामध्ये भारतीय खेल प्राधिकरणचे प्रशिक्षक कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. सध्या पारंपरिक कबड्डीबरोबरच सर्कल कबड्डीलाही चांगले दिवस आले आहेत. भारताबरोबरच कॅनडा, अमेरिका, इराण, डेन्मार्क, इटली, आदी देशांत कबड्डी खेळली जाते. भारतीय खेळाडूंना तीस ते चाळीस लाख रुपये इतके मानधन हंगामाकरिता मिळते. पंजाबच्या भूपींदरसिंह, मलकितसिंग, हरप्रीतसिंग सोनी, प्रदीपसिंग, अमरींदरसिंग या खेळाडूंना भारतीय संघातून खेळण्याची चांगली संधी आहे. सध्या देशात विविध लीग कबड्डी स्पर्धा भरविल्या जात आहेत. याचा कबड्डीच्या प्रगतीसाठी चांगला फायदा आहे. यातून खेळाडूंना पैसा, प्रतिष्ठा लाभणार आहे.
कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातील काही भागांत मी यापूर्वी कबड्डी स्पर्धा खेळण्यास आलो असून येथील वातावरण हे कबड्डी, कुस्तीसाठी पोषक आहे. योग्य दिशा दिल्यास या मातीतूनही कबड्डीचे हिरे निघतील.
कबड्डीत भारताचा झेंडा कायम ठेवावयाचा असेल तर शालेय स्तरावर कबड्डीसाठी सर्व राज्यांतील सरकारांनी योगदान दिले पाहिजे. कबड्डी हा मातीबरोबरच रबरी मॅटवरही खेळला जातो आहे. त्यामुळे विदेशात मॅटवर जादा खेळ होत आहे. याकरिता देशांतर्गत स्पर्धेत मातीबरोबरच मॅटचाही वापर वाढविला पाहिजे.
बलवीरसिंग यांच्याविषयी थोडे...
पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बलवीर यांची १९९८ साली प्रथम भारतीय कबड्डी संघात निवड झाली. पाकिस्तान, श्रीलंका, जपान, मॉरिशस, कॅनडा, इराण, डेन्मार्क, इटली या संघांविरोधात त्यांनी भारताकडून प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय २०१०मध्ये भटिंडा (पंजाब) येथे भरविण्यात आलेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही कामगिरी केली. या सामन्यात भारताने दोन कोटींचे बक्षीस पटकावले. सध्याही ते भारतीय संघाचे कबड्डी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.