...अन्यथा पुन्हा केडीएमसीत निवडणूक लढवणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2015 03:39 AM2015-10-24T03:39:40+5:302015-10-24T03:39:40+5:30

केंद्रात आणि राज्यात बदल घडवलात ना? मग आता कल्याण-डोंबिवलीतही बदल घडवा! मला पूर्ण सत्ता द्या, या शहरांचा नाशिकप्रमाणे कायापालट केला नाही, तर मी पुन्हा या ठिकाणी

... otherwise the KDMC will not contest the election again! | ...अन्यथा पुन्हा केडीएमसीत निवडणूक लढवणार नाही!

...अन्यथा पुन्हा केडीएमसीत निवडणूक लढवणार नाही!

Next

डोंबिवली : केंद्रात आणि राज्यात बदल घडवलात ना? मग आता कल्याण-डोंबिवलीतही बदल घडवा! मला पूर्ण सत्ता द्या, या शहरांचा नाशिकप्रमाणे कायापालट केला नाही, तर मी पुन्हा या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत केले. केडीएमसी निवडणुकांमध्ये पक्ष प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. २० वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही. त्यामुळेच आजही या ठिकाणचा नागरिक दडपणात जीवन जगत आहे. येथे पायाभूत सुविधांची बोंब आहे, अनधिकृत बांधकामे सररासपणे उभी राहत आहेत. खेळांची मैदाने, उद्याने नाहीत. करमणुकीची साधने नाहीत ही या शहरांची शोकांतिका आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. हे चित्र बदलण्यासाठी एकदा तरी संपूर्ण सत्ता माझ्या हाती द्या, मग बघाच मी काय करतो ते, असे ते म्हणाले. ठाणे जिल्हा हा भारतातील एकमेव जिल्हा आहे जेथे ठाणे, केडीएमसी, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई, उल्हासनगर या सहा महानगरपालिकांचा समावेश आहे. महापालिका कधी निर्माण होतात जेव्हा लोकसंख्या वाढते. कुठून आली ही माणसे? हे सर्व बाहेरून आलेले आहेत. मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर नायजेरीयनही वस्तीला आलेले आहेत. ती माणसे मारामाऱ्या करतात, ड्रग्जचा व्यवसाय करतात. अबू आझमींसारखी माणसे कोणामुळे निवडून येतात? आझमगढ, यूपी आदी ठिकाणांहून येथे आलेल्या परप्रांतीयांमुळेच ना, असा सवालही त्यांनी केला. हेच या ठिकाणीही होत आहे. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
आज मी येथे आलो आहे १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करतो, असे म्हणताच प्रचंड टाळ्या-घोषणा झाल्या. त्यावर राज म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्ही असेच फसता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस येथे आले आणि ६५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. अहो, पण पैसे येणार कुठून? राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे.
परदेशातून पैसे आणायचे तर ‘जपान’मध्ये वाकून वाकून डोके गुडघ्याला टेकायला लागले. पण उपयोग काही नाही. त्यामुळे केंद्र व राज्यात पैसाच नाही, तर हे देणार कुठून? असा टोलाही लगावला.

काँग्रेस-भाजपात फरक काय?
केंद्रासह राज्याच्या आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये फरक काय आहे? आधीही हायकमांडला विचारायला लागत होते आणि आताही.. मग बदल काय झाला? १०० दिवसांत अच्छे दिन येणार होते, आता तर ५०० दिवस झाले कुठे गेले अच्छे दिन? तूरडाळ, मूगडाळ यांचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तरी पॅकेज कसले जाहीर करतात हे समजतच नाही. त्यामुळेच मतदारांनी जागृत राहावे, हे सगळे सारखेच आहेत. निवडणुका आल्या की गोड बोलायचे नंतर ओरबाडायचे अशी या सर्वांची वृत्ती आहे.
अनधिकृत बांधकामांमध्ये सर्वसामान्यांची घरे जातात. त्यांच्या डोक्यावर सातत्याने टांगती तलवार असते. महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, आमदार, बिल्डर यांच्यावर कारवाई होत नाही. पैसे देऊन ते सुटतात, पण सर्वसामान्यांची मात्र परवड होते.

शिवसेनेला टोला : यांचे काय तर म्हणे विचारांचे सोने लुटा, तुम्ही विचार घ्यायचे, त्यांनी महापालिका लुटायची. हे असेच सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे वाभाडे काढले.

विकास बघायचाय चला नाशिकला...
मला नासिकमध्ये पूर्ण सत्ता मिळाली. ३.५ वर्षांत काय बदल झाला ते बघा. कोट्यवधीचे रस्ते झालेत, भारतात कुठेही नसतील असे ते आहेत. तेथे गार्डन, बाग, खेळाची मैदाने आहेत. इथे ती नाहीत. नुकतेच चिल्ड्रन्स ट्रॅफिक गार्डन निर्माण केले. ते बघायला या. मी काही फडवणीस नाही, मी राज ठाकरे आहे. येथे पूर्ण सत्ता दिल्यास ठाण मांडून बसेन, बदल घडवेन. येणार आणि जाणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Web Title: ... otherwise the KDMC will not contest the election again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.