...नाहीतर लोक मारायला उठतील!

By Admin | Published: March 11, 2015 01:52 AM2015-03-11T01:52:14+5:302015-03-11T01:52:14+5:30

महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत.

... otherwise people would wake up to kill! | ...नाहीतर लोक मारायला उठतील!

...नाहीतर लोक मारायला उठतील!

googlenewsNext

मुंबई : महसूलमंत्री, कृषिमंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यातले, मात्र गेल्या काही महिन्यांत ३२७ आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. शेतकरी आपल्या पोरीबाळींचं लग्न करायला तयार नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीने कामं केली नाहीत म्हणून ते विरोधात बसलेत, आम्हीही तसेच वागलो तर उद्या आम्ही तिकडे बसू... शेतकऱ्यांचा अंत पाहू नका... ज्या दिवशी शेतकऱ्यांत एकजूट होईल त्या दिवशी तुम्ही-आम्ही आमदार पुढे पळत सुटू आणि शेतकरी काठ्या घेऊन मारायला मागे पळतील... ती वेळ येऊ देऊ नका... असे खडे बोल शिवसेनेचे आ. गुलाबराव पाटील यांनी सरकारला ऐकवले.
विधानसभेत भाजपा सदस्य डॉ. संजय कुटे आणि अन्य सदस्यांनी २९३ अंतर्गत अवकाळी पावसावर चर्चा घडवून आणली होती. त्यावर बोलताना आ. पाटील म्हणाले, भाजपा-शिवसेनेचे सरकार आले खरे; पण अधिकारी आमच्याशीच राजकारण करू लागले आहेत. तहसीलदार आमचं ऐकत नाही. मदत मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना बाप जिवंत असल्याचे तीनतीन पुरावे मागतात. मतदारसंघात फिरताना लाज वाटते. शेतकऱ्यांना राजा म्हणता पण तो भिकारी झालाय. कोणी काय केलं हेच बोलत बसू नका, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिला नाहीत तर तुमचं आमचं काम आटोपलं असं समजा... अशा शब्दांत पाटील यांनी सरकारच्या डोळ्यांत अंजन घातले.
शिवसेनेचे आ. अर्जुन खोतकर यांनी तर सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, दुधाचे भाव, धान्याचे भाव ठरवणारे तुम्ही कोण? जो पिकवतो त्याला ठरवू द्या... शेतकरी उद्ध्वस्त झालाय, ५० लाखांच्या संत्र्यांच्या बागा मोडून गेल्या, आघाडी सरकारने कापसाला ६ हजारांचा भाव दिला; तुम्ही निदान २०० रुपये तर जास्तीचे द्या. लोक आम्हाला बोलतात, काय तोंड घेऊन जायचं आम्ही लोकांकडे, असेही आ. खोतकर यांनी सुनावले.
या चर्चेत भर टाकली ती भाजपाचे आशिष देशमुख यांनी. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात; पण सरकारी कर्मचाऱ्याने कधी आत्महत्या केल्याची बातमी तुम्ही वाचली का? हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तरी ठरवा. खासदार, आमदारांनी एक वर्षाचा भत्ता आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांसाठी द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

Web Title: ... otherwise people would wake up to kill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.