Uddhav Thackeray Interview : अन्यथा ते मोदींशी स्वत:ची तुलना करतील आणि पंतप्रधानपद मागतील, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:35 AM2022-07-27T08:35:01+5:302022-07-27T08:35:01+5:30
स्वतःला मुख्यमंत्रिपद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर ‘ही आमची शिवसेना’ म्हणून शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले आहेत. - उद्धव ठाकरे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, आपण शिवसेनेतून बाहेर पडलो नसून शिवसेना ही आपलीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
“तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं.
“भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ मध्ये भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय,” असा सवालही त्यांनी केला.
'उद्या मोदीशी तुलना करतील'
स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की, ‘ही आमची शिवसेना’ म्हणून. अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे. हे बघितल्यानंतर भाजप त्यांना कधी पुढे करेल असे वाटत नाही. नाही तर नंतर ते नरेंद्र मोदींशी स्वतःची तुलना करतील आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते, ही चटक आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.