आमचा अजेंडा कोपर्डीच राहणार - भय्यूजी महाराज
By Admin | Published: September 21, 2016 09:50 PM2016-09-21T21:50:44+5:302016-09-21T21:50:44+5:30
आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, मराठा समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २१ : आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, मराठा समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा, असे स्पष्टीकरण राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या वतीने सूर्योदय परिवाराने बुधवारी येथे दिले.
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे राज्यभर मोर्चे निघत आहेत. मोर्चाच्या आयोजनातील भय्यूजी महाराज यांच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सूर्योदय परिवाराने पत्रकार परिषद घेऊन भय्यूजी महाराज यांची बाजू विशद केली. भय्यूजी महाराजांचे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, हितेन पटेल, मनोज जैस्वाल, संतोष पाटील, जितेश खुराणा, किशोर देशमुख, दीपक यादव, सत्यकुमार शेळके यावेळी उपस्थित होते.
मराठा मोर्चात मी का लक्ष घालतो, मला प्रसिद्धीचा हव्यास आहे काय, अशा चर्चा सोशल मीडियात सुरू आहेत; परंतु केवळ मानवतेच्या भूमिकेतूनच मी कोपर्डीचा प्रश्न हाती घेतला. कुणाच्या स्वार्थापायी या प्रश्नाला बिभीत्स वळण लागावे, या निर्घृण अत्याचारात बळी पडलेल्या अभागी कन्येच्या वेदनेचा तसेच तिच्या मातेचा मी अपमान समजतो,ह्णअसे भय्यूजी महाराज यांनी निवेदनात म्हटले आहे.
मागणी धसास लागेपर्यंत लढत राहणार
कोपर्डीतील घटना समोर आल्यानंतर मी सर्वप्रथम तेथे पोहोचलो. दु:खी कुटुंबाला आध्यात्मिक बळ दिले. शाळेत जाण्यास घाबरलेल्या मुलींसाठी चार बसेस दिल्या. कन्याधाम सुरक्षा योजना सुरू केली, तसेच गावात संस्कार अभियान सप्ताह घेतला. पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिचे हाल करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी तेव्हापासून लावून धरली असून, ती धसास लागेपर्यंत लढत राहणार आहे,ह्णअसे निवेदनात म्हटले आहे.
श्रेय, प्रसिद्धीचा प्रश्नच नाही
कोपर्डीच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चांतून श्रेय व प्रसिद्धी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकप्रियता मला नवीन नाही. कुठलाही राजकीय स्वार्थ मला साधायचा नसून, माझा मार्ग सेवेचा आहे, असे भय्यूजी महाराज यांनी स्पष्ट केले आहे.