घर ना दार, वारीच आमचा परिवार!

By admin | Published: June 29, 2016 07:33 PM2016-06-29T19:33:00+5:302016-06-29T19:33:00+5:30

कुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन

Our family, our family! | घर ना दार, वारीच आमचा परिवार!

घर ना दार, वारीच आमचा परिवार!

Next

मिलिंदकुमार साळवे,  अहमदनगर
कुणाच्या पायात चप्पल, कुणाच्या बूट तर कुणी अनवाणीच. काहींच्या डोक्यात फेटे तर काहींच्या डोक्यावर टोप्या. काखेत कापडी पिशवी नाही तर पाठीवर धोपटी किंवा सॅक. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन. पावलं झपाझप चालत राहतात. कुणालाही घरादाराची चिंता नाही. सर्वांचा मार्ग एकच, पंढरीचा! सर्वांना आस पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाची. घरदार, सारं विसरून सारे पंढरीच्या वाटेने निघालेले. आता जवळपास महिनाभर ना घर, ना दार. साऱ्यांचा वारी हाच एक परिवार!
त्र्यंबकेश्वरहून २० जूनला निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने नाशिक सोडून नगर जिल्ह्यात प्रवेश केला. संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुका ओलांडून पालखी नगरकडे निघालीय. बेलापूरचा मुक्काम आवरून बुधवारी देवळाली, राहुरीकडे प्रस्थान ठेवलं. २५ दिवसांचा प्रवास करून १४ जुलैस पंढरीत पोहोचणारी ही पालखी मजल, दरमजल करीत ‘विठ्ठल... विठ्ठल’ म्हणत एक एक मुक्काम मागे टाकीत पुढे चालली आहे. नेहमीच्या घरदार, संसार, प्रपंचातून बाहेर पडत वारकरी वारीत सामील झाले आहेत. २५ दिवस दररोज पायपीट. चार भिंतीचं घर नाही. मुक्कामाच्या ठिकाणी असेल त्या परिस्थितीत रहायचं. मंगळवारी काहीजण बेलापूर रस्त्यावरच्या काळे रसवंतीच्या परिसरात थांबले, काही पुढे निघाले. रिकाम्या शेतात वारकऱ्यांनी विसावा घेतला. ‘व्होल वावर इज अवर’ म्हणत वावरातच मुक्काम ठोकला. वर आकाशाचं छत. खाली जमिनीचा गालिचा. मिळेल, त्या ठिकाणी झोपून रात्र काढली. पहाटे उठून ज्याच्या त्याच्या पद्धतीने, मिळेल तिथं पाणी पाहून आंघोळ पांघोळ, सकाळचे निधी उरकले. पुरुषांनी मोकळ्या रानात तर महिलांनी आडोसा शोधून आंघोळी केल्या. सकाळी १०- ११ वाजेपर्यंत महिला, पुरुषांनी वाळलेले कपडे गोळा केले.
कपाळाला चंदनाचा, अष्टगंधाचा टिळा. पुन्हा वारी सुरू. चहा, नाष्टा, जेवणाची भ्रांत नाही. वारीच्या वाटेवर ठिकठिकाणच्या भाविकांकडून ही सोय होते. त्याचा आस्वाद घेत घेतच पुढे सरकायचं. टाळ, मृदूंग, भजन, मधूनच विठ्ठलाचा व संत निवृत्तीनाथांचा जयघोष. नो टेन्शन!
जग बदललंय तसे वारकरी बदलले. आता बहुतेक वारकऱ्यांच्या हाती मोबाईल आहेत. वारीत असले तरी गावाकडे कनेक्टिव्हिटी ठेवत त्यावरुन काहीजण पावसाची खबरबात घेत असतात. पालखीसोबत टेम्पो, ट्रक, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका असा मोठा लवाजमाही आहे. ट्रक, टेम्पो म्हणजे काही जणांचं फिरतं घरच.

२३० किलो चांदीचा रथ
२० जूनला त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी २५ दिवसांचा नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करीत १४ जुलैस आषाढी एकादशीला पंढरीत पोहचेल, असं पालखीचं काटेकोर वेळेचं व्यवस्थापन. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ज्ञानोबा माउलींचे गुरू व ज्येष्ठ बंधू निवृत्ती महाराजांची ही पालखी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानतर्फे निघते.
शेकडो महिला, पुरूष भाविक वारकरी अतिशय शांततेत, शिस्तीत चालत असतात. पालखी रस्त्याने चालत असताना वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी प्रत्येक जण घेत असतो.
२३० किलो चांदीचा रथ या पालखीचे मुख्य आकर्षण आहे. धडधाकट जसे वारीत आहेत, तसे अपंगही आहेत. काहीजण तीन चाकी सायकलीस भगवी पताका लावून पालखीसोबत विठुरायाचा गजर करीत पंढरीकडे निघाले आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तसे अनेक प्रकारची, अनेक तऱ्हेची माणसं वारीत भेटतात.

Web Title: Our family, our family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.