पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे - एम. एस. बिट्टा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:09 PM2019-09-04T18:09:24+5:302019-09-04T18:13:01+5:30
३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़...
पुणे : काश्मीर हा भारताचा अभिवाज्य भाग असून, जम्मू-काश्मीरशिवायभारत हा अपूर्ण आहे़. ३७० कलम हटविल्यामुळे भारत भविष्यात दहशतवादी कारवायांपासून मुक्त झालेला देश असेल़. दरम्यान, आता पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हे आपले ध्येय असावे़, असे प्रतिपादन एआयएटीएफचे चेअरमन एम़.एस़.बिट्टा यांनी केले़.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने अखंड हिंदुस्थानातील गणेशोत्सवाच्या छायाचित्रांच्या चित्रग्रंथ या स्मरणिकेचे प्रकाशन बिट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, उत्सवप्रमुख पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सीरिचच्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विवेक खटावकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, राजाराम मंडळाचे युवराज निंबाळकर हे उपस्थित होते़.
एम.एस. बिट्टा म्हणाले, आपल्या देशातील राजकीय पक्षांचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी ध्येय मात्र एकच असायला हवे. ३७० कलम हटवणे ही कृती काश्मिरी जनता, मुस्लिम विरोधी नाही. तो देश हितासाठीचा महत्वाचा निर्णय आहे़
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांच्या मनात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा निर्माण करण्यासाठी भाऊसाहेब रंगारी यांनी आपल्या हाताने दुष्ट व अन्याय्य प्रवृत्तींच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देणार्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. शिवाय भाऊसाहेब रंगारीं यांचा टिळकांच्या नेतृत्वाला पाठींबा होता. तर, केसरी मध्ये भाऊसाहेबांच्या कार्याचा गौरव केसरी मध्ये टिळकांनी केल्याचे आढळते.
यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी केले. तसेच सुत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
------------------------