काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा आमची कामगिरी सरस!
By Admin | Published: October 31, 2016 11:08 PM2016-10-31T23:08:50+5:302016-10-31T23:08:50+5:30
कृषी मंत्री फुंडकर यांचा पत्रकार परिषदेत दावा; विदर्भ अनुशेष निर्मूलनासाठी दिला सर्वाधिक निधी.
अकोला, दि. ३१- देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात भाजपाची कामगिरी ही काँग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळापेक्षा सरस असल्याचा दावा कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपा सरकारच्या द्विवर्षपूर्तीबद्दल सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना त्यांनी विदर्भ अनुशेष निर्मूलनासाठी सर्वाधिक निधी दिला असल्याची आकडेवारी सादर करून येणार्या पाच वर्षात सर्व आश्वासनांची पूर्ती करणार असल्याची ग्वाही दिली.
येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कृषी मंत्री फुंडकर म्हणाले की, विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी अमरावती विभागात केवळ दोन वर्षात ३ हजार ६0 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात हाच खर्च १ हजार ७५0 कोटी एवढा होता. दोन वर्षात २१ हजार ७३५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली; मात्र काँग्रेस आघाडीच्या काळात हीच क्षमता फक्त १0 हजार ३१४ हेक्टर एवढी होती. भूसंपादनाच्या बाबतीतही हाच प्रकार असून, काँग्रेसने ४ हजार ५१२ हेक्टर भूसंपादन केले होते. ते भाजपाच्या काळात १६ हजार ४७६ हेक्टर एवढे झाले असल्याचा दावा त्यांनी केला. पीक विमा वाटप, अ पूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी, पर्यटन, उद्योग, कृषी विकास, ई-सरकार अशा सर्व आघाड्यांवर भाजपा सरकार हे काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळापेक्षा अधिक सरस असल्याची आकडेवारी त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात ११ हजार ४८३ गावांमध्ये २ लाख ४१ हजार ९७ कामे पूर्ण झाली असून, त्या माध्यमातून शाश्वत सिंचनाचे स्रोत खुले झाले आहेत. या सर्व कामांमुळे ४२ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून, ११ लाख ६४ हजार ३४७ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाली असून, २0१९ पर्यंत ह्यदुष्काळमुक्त महाराष्ट्रह्ण ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी अकोल्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर उज्जवला देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात, भाजपा महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, गोपी ठाकरे आदी उपस्थित होते.
खामगावात लवकरच टेक्सटाइल्स पार्क!
-वस्त्रोद्योगामध्ये भाजपा सरकार हे अग्रेसर असून, अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे टेक्सटाइल्स पार्क कार्यान्वित झाला असून, ७0 हजारावर लोकांना रोजगार मिळणार आहे. असाच टेक्सटाइल पार्क लवकरच खामगाव येथे सुरू केला जाणार असून, पारस येथेही यासंदर्भात पाहणी झाली असून, पुढील टप्प्यात येथेही टेक्सटाइल पार्क सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.