सावरकरांबाबत आमची भूमिका स्पष्ट, त्यात कोणताही बदल नाही- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 07:19 PM2019-12-15T19:19:53+5:302019-12-15T19:34:21+5:30
माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.
नागपूरः माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून आता भाजपानं त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद,', असं म्हटलं आहे.
तसेच 'आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे,' अशा शब्दांमध्ये त्यांनी राहुल गांधींवर नाव न घेता दुसऱ्यांदा ट्विट करून टीकास्त्र सोडलं. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सावरकरांबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीचं वाद उद्धभवण्याची शक्यता आहे.
सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले. विकासकामांना स्थगिती दिल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. पण आम्ही किती विकासकामांना स्थगिती दिली हे तर सांगा ? आरे मेट्रो कारशेड वगळता राज्यातील एकही प्रकल्प स्थगित केलेला नाही. आरेमधील जैवविविधतेबाबत बरीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी ही स्थगिती देण्यात आलेली आहे.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले."सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नाही."
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 15, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/ZJlmZks8q9