आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल: सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:50 AM2024-08-16T05:50:00+5:302024-08-16T05:50:01+5:30
पक्षाच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्याचा हेतू अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केला. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संविधान हा आमचा वैचारिक गाभा आहे. संविधानाप्रति आदर नव्हे, तर संविधान विचारधारेवर आपापल्या जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. खंडप्राय आणि सर्वधर्मीय देश एकात्मतेच्या माध्यमातून अधिक मजबूत कसा करता येईल या दृष्टीने पक्ष काम करीत आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
कालच ३४ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम सरकारने जमा केली आहे. यामुळे महिला वर्गात आनंदाचे, बंधुत्वाचे, विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही तटकरे म्हणाले.
विरोधक केविलवाणे
विरोधकांना काहीच बोलायला मिळत नसल्याने लाडकी बहीण योजनेवर ते टीका करीत आहेत. विरोधकांना एका दिवसात ३४ लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल याची खात्री नव्हती. राजकीय अस्तित्वाची केविलवाणी धडपड करीत असताना महिलांप्रति राज्य सरकारने जी योजना आणली आहे त्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का लागणार असल्याने ते संभ्रम निर्माण करीत असल्याची टीकाही तटकरे यांनी यावेळी केली.