आमच्या बहिणीने तर चिक्कीचे पैसे खाल्लेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:24 AM2019-01-14T06:24:51+5:302019-01-14T06:25:13+5:30
परिवर्तन यात्रेत धनंजय मुंडे यांची टीका
विक्रमगड : ‘आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले,’ अशी टीका करीत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी पक्षावर आसूड ओढला. राष्टÑवादी कॉँग्रेसची परिवर्तन संपर्क यात्रा रविवारी विक्रमगडमध्ये पोहोचली. या वेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी फडणवीस सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचताना, राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना लक्ष्य केले.
फडणवीस सराकरमधील १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटी लुटून नेले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला ‘भ्रष्टाचारयुक्त’ केले. नरेंद्र मोदींची २०१४ सालच्या निवडणुकांपूर्वीची भाषणे आणि आताची भाषणे ऐकली की, मला ‘गजनी’ चित्रपटातील आमिर खानची आठवण येते. कारण त्यांनाही दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. अहो, येथे विक्रमगडच्या चौकाचौकातही मोदींच्या ‘अच्छे दिन’ची चेष्टा होत असेल, असा टोला मुंडे यांनी लगावला. २०१४ सालच्या मोदी लाटेत देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, आता त्यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या समारोपाप्रसंगी मोदी यांनी आम्ही भ्रष्टाचारमुक्त शासन दिले, याचा गर्व आहे, असे म्हटले होते. त्यावरून समाचार घेताना मुंडे यांनी जर भ्रष्टाचारमुक्त शासन दिले तर मग व्यापम, राफेल काय आहे? असा सवाल केला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री गणेश नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.