राज्यातील २७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी, १६६ कारखान्यांकडे थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 02:08 AM2019-03-19T02:08:06+5:302019-03-19T02:08:44+5:30
राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे.
पुणे : राज्यातील केवळ २७ साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) संपूर्ण रक्कम दिलेली आहे. अजूनही १६६ साखर कारखान्यांकडे ४ हजार ९२६ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी असून, १४ हजार ८८१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, साखर आयुक्तालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर
आली आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेला उठाव नसल्याने बहुतांश कारखान्यांकडे एफआरपी थकीत होती. साखरेचा उत्पादन खर्च आणि साखरेची किमान आधारभूत किंमत यामध्ये चारशे ते साडेचारशेंचा फरक असल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे होते. त्यामुळे साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपये प्रतिक्विंटलवरुन ३५०० रुपये करावा अशी मागणी कारखान्यांनी केली होती. थकीत एफआरपीचा आकडा वाढल्याने, शेतकरी संघटनांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. अखेरीस केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९०० रुपयांवरुन ३१०० रुपये केला.
यंदाच्या गाळप हंगामानुसार राज्यात १५ फेब्रुवारीच्या गाळपानुसार १२ हजार ९४९ कोटी रुपयांची एफआरपी दिली होती. तर, ४ हजार ८६४ कोटी रुपये थकीत होते. तर, १५ मार्चच्या अहवालानुसार राज्यात ८३९.६९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानुसार एकूण एफआरपीची रक्कम १९ हजार ६२३ कोटी ४३ लाख रुपये होते. त्यातील १४ हजार ८८१ कोटी (७६ टक्के) रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, ४ हजार ९२६ कोटी (२४ टक्के) रुपयांची रक्कम थकीत आहेत.
करारानुसार शेतकऱ्यांना मिळणार ३१०० कोटी
शुगर केन कंट्रोल आॅर्डर १९६६ नुसार एफआरपीसाठी राज्यातील २९ कारखान्यांनी शेतकºयांशी करार केले आहे. त्यानुसार शेतकºयांना ३१२७ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. अनेक कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम सुरुवातीस, तर उर्वरीत रक्कम बैलपोळा आणि दिवाळीला देण्याचा करार केला आहे.
आणखी चार कारखान्यांवर आरआरसीची कारवाई
वारंवार सांगूनही एफआरपीची रक्कम न देणाºया आणखी चार साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू अॅण्ड रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले आहे. त्यामुळे आरआरसी कारवाई केलेल्या कारखान्यांची संख्या ४९ झाली आहे. औरंगाबादचा घृष्णेश्वरकडे ३९.२५, सोलापूरच्या फॅबटेक ४६.०६, सांगलीच्या माणगंगाकडे ३.३६ आणि बीडच्या वैद्यनाथ कारखान्याकडे ३६.१० कोटी रुपयांची थकबाकी आहे.