कुटुंबातील वृद्धेचे मरणही ठरले बहिष्कृत
By admin | Published: September 11, 2015 05:26 AM2015-09-11T05:26:14+5:302015-09-11T09:34:36+5:30
लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध
नेर (यवतमाळ) : लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेला ३ हजार लोकसंख्येपैकी एकही माणूस फिरकला नाही. केवळ बाप-लेक अन् नातवाने काढलेली ही अंत्ययात्रा अख्ख्या जिल्ह्याला सुन्न करून गेली.
गावाने एखाद्या घरावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार साऱ्यांनाच ठाऊक आहे. दगडधानोरा गावात मात्र एका घरानेच संपूर्ण गावावर बहिष्कार टाकला आहे. या घटनेमागील अंतस्थ धागा शोधण्यासाठी कॅलेंडरची पाने उलटत ९ वर्षे मागे जावे लागले. २००६मध्ये गावातील एका व्यक्तीचा खून झाला. त्यात भीमराव यांचा मुलगा अवधूत आणि नातू मिलिंद आरोपी होते. या प्रकाराने मूळचेच एकलकोंडे असलेले भीमराव अधिकच खचले. काही काळानंतर अवधूत व मिलिंद निर्दोष सुटलेही. पण भीमरावच्या मनातील अढी मात्र कायम राहिली; ते आणखी विक्षिप्तासारखे वागू लागले.
अवधूतही बिथरला होता. कुणीही आमच्या घरी यायचे नाही, अशी एककल्ली भूमिका या कुटुंबीयांनी स्वीकारली. कुणी घरी गेले तरी हाकलून देण्याचे प्रकार सुरू झाले. त्यांच्या विचित्र (पान ९ वर)
कसाबसा अखेरचा निरोप
बाजूच्याच गावात असलेली नर्मदाबाईची मुलगी या घटनेबाबत अनभिज्ञ होती. कुठून तरी उडत-उडत आईच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावर गेली अन् ती नवऱ्याला घेऊन तडक दगडधानोऱ्यात पोहोचली. तर घरी कुणीही नव्हते. काय झाले ते सांगायलाही कुणी नव्हते. तिने अंदाजानेच स्मशान गाठले.
तिथे वेगळाच पेच निर्माण झाला होता. मृतदेहाच्या तुलनेत खड्डा छोटा झाला. ऐनवेळी पोहोचलेल्या जावयाने तो खणून मोठा केला. अन् नर्मदाबाईला कसाबसा अखेरचा निरोप देण्यात आला.
या परिवारातील लोक कधीही गावाच्या संपर्कात राहात नव्हते. नातेवाइकांशीही बोलत नव्हते. साधे मतदानाच्या निमित्तानेही ते घराबाहेर इतरांमध्ये मिसळत नव्हते. मतदानच करीत नव्हते.
- मनोज ठाकरे, पोलीस पाटील, दगडधानोरा
आमच्या गावात असे पहिल्यांदाच घडले. पण काय करावे? या परिवाराला त्यांच्या घरी कुणीही आलेले चालत नाही. मग गावकरी जाणार कसे?
- गजानन महल्ले, ग्रामस्थ, दगडधानोरा