मृत्यूच्या दाढेतून महिन्याभराने बाहेर
By admin | Published: May 31, 2016 06:31 AM2016-05-31T06:31:37+5:302016-05-31T06:31:37+5:30
डाव्या बाजूच्या चेहऱ्यावर केलेल्या वारांमुळे जबडा, नाक, कानाच्या मागची बाजू आणि मेंदूला जबर मार बसला होता. मेंदूत हाडांचे तुकडे गेल्यामुळे रक्तस्त्राव झाला होता.
मुंबई : डाव्या बाजूच्या चेहऱ्यावर केलेल्या वारांमुळे जबडा, नाक, कानाच्या मागची बाजू आणि मेंदूला जबर मार बसला होता. मेंदूत हाडांचे तुकडे गेल्यामुळे रक्तस्त्राव झाला होता. पण, मुंबईतील लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन अखेर एक महिन्यांनी सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे (७४) यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. शुक्रवारी अखेर महिन्याभरानंतर त्यांना शुद्ध आल्यावर घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.
११ एप्रिल रोजी सोलापूर येथील ग्राम दैवत सिद्धेश्वरच्या दर्शनासाठी मनोहर डोंगरे गेले होते. त्यावेळी देवळाच्या आवारातच १५ ते १६ जणांनी राजकीय वैमनस्यातून त्यांच्यावर हल्ला केला. तलवार, लोखंडी सळ््यांनी बाबांवर झालेल्या हल्ल्यात ते जबर जखमी झाले होते. डाव्या बाजूचा चेहऱ्याचे अक्षरश: तुकडे झाले होते, अशी माहिती मनोहर यांचा मुलगा विजय डोंगरे यांनी दिली. डॉ. डांगे यांनी सांगितले, हल्ला झाल्यावर मनोहर यांना कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले. तेव्हा मनोहर यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डाव्या बाजूचा जबडा आणि नाक तुटले असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मेंदूतही रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १५ एप्रिल रोजी त्यांच्यावर १२ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मनोहर यांच्या चेहऱ्याचे दोन तुकडे झाले होते. २ ते ३ इंचाचे घाव त्यांच्या चेहऱ्यावर झाले होते. नाक कापले गेल्यामुळे सायनसचा भागाला इजा झाली होती. जबडा तुटला होता. कानाच्या मागील हाडे तुटली होती. दुर्बिणीच्या सहय्याने सूक्ष्मपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचवेळ चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. १२ तासांच्या शस्त्रक्रियेत इंटेसिव्हिस्ट डॉ. अन्सारी, फिजिशियन डॉ. रमेश दर्गड आणि प्लास्टिकसर्जन डॉ. श्रीरंग पुरोहित हे सहभागी होते. (प्रतिनिधी)