ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 02:41 PM2024-04-29T14:41:51+5:302024-04-29T15:15:36+5:30
Kiran Samant on Uddhav Thackeray: आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी शहरामध्ये रविवारी ठाकरे गटाची सभा झाली. या सभेला जास्त लोक न आल्याचा दावा निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून केला जात आहे. यावरून सामंत यांनी ठाकरे गटाकडे 13 आमदार आहेत त्यातील 5-6 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.
रत्नागिरी शहरामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा सभा प्रभागनिहाय झाल्या आहेत. प्रत्येक सभेला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या तोडीचे मताधिक्य रत्नागिरी जिल्हा नक्की देईल. नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
काल एक कॉर्नर सभा झाली त्या सभेची परिस्थिती पाहिली तर तेथे किती खुर्चा होत्या असा सवाल करत रत्नागिरीत आल्यानंतर कोकणच्या विकासासाठी काय करणार आहोत हे मुद्दे आवश्यक होते परंतु रिफायनरीला आमचा विरोध राहील अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आले, असा टोला सामंत यांनी लगावला.
केंद्र शासनाला रिफायनरी व्हावी यासाठी एकीकडे पत्र देता. तुमचे आमदार रिफायनरीला समर्थन देतात तर खासदार विरोध करतात. नक्की तुमची भूमिका काय आहे? असा सवाल सामंत यांनी ठाकरेंकडे उपस्थित केला. ठाकरे गटाकडे 13 आमदार आहेत त्यातील 5-6 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, 2-3 खासदार आहेत ते पण संपर्कात आहेत, असेही सामंत म्हणाले. आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरित जागांवरील उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.