रेल्वे भाडेवाढीविरोधात उद्रेक
By admin | Published: June 23, 2014 11:10 PM2014-06-23T23:10:03+5:302014-06-23T23:10:03+5:30
केंद्र शासनाने रेल्वेच्या भाडय़ात केलेल्या दरवाढीविरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Next
>पनवेल : केंद्र शासनाने रेल्वेच्या भाडय़ात केलेल्या दरवाढीविरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच्या प्रतिक्रिया सोमवारी पनवेल परिसरातही उमटल्या. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकत्र्यानी आंदोलन करीत विनातिकीट रेल्वेने प्रवास केलाच, त्याचबरोबर खारघर रेल्वेस्थानकावर रेल्वे रोखत तीव्र निदर्शने केले. मोदी सरकारविरोधात घोषणा देत कार्यकत्र्यानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
नवीन सरकार आल्यावर एका महिन्यातच रेल्वे भाडय़ात सुमारे 14.2 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मासिक पासची रक्कमही दुपटीने वाढली आहे. पनवेल आणि सिडको वसाहतीतून हजारो जण नोकरी व्यवसायासाठी मुंबईला जातात. रेल्वेच्या तिकीटदरात वाढ केल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पनवेल-सायन महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्यावर स्थानिकांना सवलत मिळावी याकरिता स्वपक्षाच्या सरकारविरोधात लढा देणा:या ठाकूर यांनी आज रेल्वे दरवाढीविरोधातही आक्रमक पवित्र घेतला. सोमवारी सकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते पनवेल रेल्वेस्थानकावर धडकले आणि काळे फलक लावून शासनाचा निषेध केला. ये देखो आ गये अच्छे दिन, रेल यात्र महंगी अशा घोषणा देत पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. प्रशांत ठाकूर यांच्यासह कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, नगराध्यक्षा चारूशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष संतोष शेट्टी, मावळ लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर चौतमोल, प्रकाश बिनेदार, माजी आरोग्य सभापती प्रभाकर बहिरा, अरविंद सावळेकर, नगरसेविका नीता माळी, कल्पना ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकत्र्यानी विनातिकीट प्रवास करून सविनय कायदेभंग केला. त्याचबरोबर खारघर येथे रेल्वे रोको करीत आपला निषेध नोंदवला. एक महिन्याच्या आत या सरकारने रेल्वे भाडेवाढ करीत जनतेचे खिसे कापण्यास सुरूवात केली आहे.
सर्वसामान्यांवर अन्याय करणारी ही दरवाढ आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन छेडले असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी यावेळी दिली. खोटी आश्वासने आणि भूलथापा देऊन भाजपा सत्तेवर आले असल्याचे या दरवाढीवरून सर्वाच्याच लक्षात आले आहे. या मोर्चेच्या वेळी रेल्वे स्थानकात मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती व सरकारच्या विरोधात मोठमोठय़ा घोषणा देण्यात आल्या. पनवेल व खारघर स्थानकात रेल रोको करण्यात आला.
रेल्वे नेमकी कशासाठी थांबवली आहे हे नेमके न कळल्याने प्रवाशांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ोते. अनेक प्रवासीही या भाडेवाढीच्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)