बीडमध्ये उद्रेक! आंदोलकांनी NCP भवन पेटवलं, आमदार क्षीरसागरांचे घर, ऑफिस जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 06:57 PM2023-10-30T18:57:44+5:302023-10-30T18:58:07+5:30
बीडमधील मुख्य बाजारपेठेत मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन जाळले आहे. त्यासोबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही संतप्त आंदोलकांकडून पेटवण्यात आले आहे
बीड – गेल्या काही दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राजकीय नेत्यांना बसला आहे. याठिकाणी सकाळी माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती त्यानंतर आता बीडमध्ये आंदोलनाचे लोण पसरले आहे.
बीडमधील मुख्य बाजारपेठेत मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन जाळले आहे. त्यासोबत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही संतप्त आंदोलकांकडून पेटवण्यात आले आहे. बीडमधील शरद पवार गटाचे आंमदार संदीप क्षीरसागर यांनाही आंदोलनाचा जबर फटका बसला आहे. याठिकाणी मराठा आंदोलकांनी संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाळपोळ केली आहे. याठिकाणी क्षीरसागर यांची ४ ते ५ वाहने संतप्त आंदोलकांनी पेटवून दिली आहेत. त्यामुळे बीडमध्ये आंदोलनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक स्वरुप आलेले आहे. गनिमी काव्याने आंदोलक याठिकाणी पोहचून वाहने पेटवत आहेत. दगडफेक करत आहेत. बीडमधील हिंसक आंदोलन पाहता प्रशासनाने आता पाऊले उचलली आहे. बीड शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजकीय नेत्यांची घरे, कार्यालये, आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. आंदोलन आणखी उग्र होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजल्यापासून आंदोलन आक्रमक करण्यात आली आहे. जाळपोळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरतील यासाठी इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे. मंगळवारी बीड जिल्हा बंद करण्याची घोषणाही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात येईल अशी माहिती समोर येत आहेत.
राजकीय पुढाऱ्यांबद्दल राज्यभरात मराठा आंदोलकांमध्ये संताप आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा यासाठी मराठा आंदोलकांकडून दबाव आणला जात आहे. त्यात भाजपाचे गेवराई येथील आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा पत्र पाठवले आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनीही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे.