मराठा आंदोलनाचा राज्यभरात भडका; आ. सोळंके, आ. क्षीरसागर यांची घरे, वाहने जाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 07:16 AM2023-10-31T07:16:38+5:302023-10-31T07:16:58+5:30

बीडमध्ये दगडफेक; खासदार गोडसे, आमदार पवार यांचाही राजीनामा

Outbreak of Maratha movement across the state as MLA Solanke, Kshirsagar houses and vehicles were burnt | मराठा आंदोलनाचा राज्यभरात भडका; आ. सोळंके, आ. क्षीरसागर यांची घरे, वाहने जाळली

मराठा आंदोलनाचा राज्यभरात भडका; आ. सोळंके, आ. क्षीरसागर यांची घरे, वाहने जाळली

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत शातंतेत सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमुळे हिंसक वळण लागले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर वाहनांसह घरही पेटविले. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यात दोघे जखमी झाले.

सायंकाळी सहा वाजता बीडमधील राष्ट्रवादी भवनचे कार्यालयही पेटविण्यात आले. तेथून हे सर्व लोक आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी गेले. त्यांचे घर व कार्यालय, घरासमोरील वाहने पेटविण्यात आले. मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बीडमधील जालना रोडवरील हॉटेल सनराइजही पेटवून देण्यात आले. गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील भाजप आमदार प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडण्यात आले. सायंकाळी बीड शहरातील घरही जाळण्यात आले. माजलगावातीलच नगरपालिका, पंचायत समिती कार्यालयावर दगडफेक करून ते पेटविण्यात आले.

खासदार गोडसे, आमदार पवार यांचाही राजीनामा

  • मराठा आरक्षणासाठी हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी  खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.
  • गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, उपाध्यक्ष बबनराव गवते यांच्यासह केज तालुक्यातील ठाकरे गटाच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिले.


बीडमध्ये संचारबंदी

रविवारी बीडमध्ये मध्यरात्रीपासून आंदोलनांनी उग्ररुप धारण केले आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी सोमवारी रात्री आठ वाजता तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश जारी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी पोलिस विभागाने सुरू केली.

मुख्यमंत्री-राज्यपाल भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिल्याचे समजते. तसेच आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कोणती पावले उचलत आहे, त्याबाबतही त्यांनी माहिती दिल्याचे समजते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी दुपारी राज्यपालांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मनोज जरांगेंचे उपोषण मागे घेण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी काय पावले उचलता येतील यावर चर्चा झाल्याचे समजते.

भुजबळ-फडणवीस भेट

मराठा आंदोलकांचा मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्यावर रोष आहे. यातूनच पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तांची जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे समजते.

राज्यभरात कुठे काय घडले?

  • जालना :  एसटी बसेस बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको
  • बीड : आष्टीत तहसीलदारांची शासकीय गाडी जाळली. 
  • धाराशिव : धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
  • लातूर : ४ युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
  • नंदूरबार : ग्रामस्थ गुलाब पाटील यांचे पाच दिवसांसून उपोषण
  • यवतमाळ : आमदारांचा ताफा अडविला
  • कोल्हापूर : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी
  • सांगली : विटा येथे उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
  • सातारा : कऱ्हाडमध्ये महामोर्चा

Web Title: Outbreak of Maratha movement across the state as MLA Solanke, Kshirsagar houses and vehicles were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.