वस्त्रनगरीवर बालोत्रातील प्रोसेसर्स बंदचा परिणाम
By admin | Published: July 25, 2015 12:06 AM2015-07-25T00:06:47+5:302015-07-25T01:13:31+5:30
राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने सरकारने मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी
अतुल आंबी - इचलकरंजी -बालोत्रा (राजस्थान) येथे कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स बंद असल्याने इचलकरंजीतील उद्योजक हवालदिल झाले आहेत. दररोजचे ५० लाख मीटर उत्पादन होणारे कापड ठप्प झाले आहे. त्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान येथील वस्त्रोद्योगाला सहन करावे लागत आहे. बालोत्रा येथे लहान-मोठे ७८० प्रोसेसर्स आहेत. त्यातील फक्त १० प्रोसेसर्स सुरू आहेत. उर्वरित सर्व प्रोसेसर्स प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईनंतर १५ मेपासून बंद आहेत. याबाबत एनजीटी न्यायालयात सुनावणी सुरू असून, तीन तारखा झाल्या आहेत. ३१ जुलैला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, बालोत्रा येथील बंदमुळे इचलकरंजी शहरातील सुमारे ६० हजार लूम्सवर दररोज उत्पादन होणारे ५० लाख मीटर कापड ठप्प झाले आहे. यामध्ये केंब्रिक, पॉपलीन, पीसी (पॉलिस्टर कॉटन) या क्वॉलिटींचा समावेश आहे. बंदच्या आधी उत्पादन झालेले लाखो मीटर कापड शहरातील गोडावूनमध्ये भाडेतत्त्वावर पडून आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कापड खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
परिणामी, अडते, व्यापारी या कापडाचे पैसे कारखानदारांना देत नाहीत. कारखानदार यार्न व्यापाऱ्यांचे देणे बाकी आहेत. तर उत्पादन ठप्प झाल्याने कामगारांनाही काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. या क्षेत्रातील सर्वच घटकांची यामुळे आर्थिक कुचंबना होत आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने सरकारने मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी कारखानदार व व्यापाऱ्यांनी येथील आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे केली आहे.
वस्त्रोद्योगाची साखळी ब्लॉक झाली
लाखो मीटर कापड गोडावूनमध्ये पडून असल्याने शहरातील अनेक गोडावून हाऊसफुल्ल झाली आहेत. या कापडाचा उठाव नसल्याने अडत्याने कारखानदारांचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे कारखानदारांनी यार्न, स्पेअर पार्ट, जॉबर, गोडावून भाडे यासह अवलंबून असलेल्या अन्य घटकांना त्यांचे पैसे दिलेले नाहीत. परिणामी, एकमेकांवर अवलंबून असलेली सर्वच साखळी ब्लॉक झाली आहे. यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प आहे.
३१ जुलैला ‘किमान वेतन’ची सुनावणी
बालोत्रा येथे इचलकरंजीतील ८० टक्के कापडावर प्रक्रिया होत होती
पॉपलीन, केंब्रिक, पीसी क्वॉलिटींचा समावेश
उत्पादन ठप्प