पदे भरण्यासाठी नियमबाह्य पद्धत

By admin | Published: October 13, 2015 03:08 AM2015-10-13T03:08:46+5:302015-10-13T03:08:46+5:30

रुग्णांच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या परिचर्या आणि परिचारिकांना शिक्षण देणाऱ्या परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयातील वरिष्ठ दर्जाची रिक्त पदे नियमबाह्य

Outline method for filling posts | पदे भरण्यासाठी नियमबाह्य पद्धत

पदे भरण्यासाठी नियमबाह्य पद्धत

Next

जमीर काझी, मुंबई
रुग्णांच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या परिचर्या आणि परिचारिकांना शिक्षण देणाऱ्या परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयातील वरिष्ठ दर्जाची रिक्त पदे नियमबाह्य पद्धतीने भरण्याचा घाट वैद्यकीय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांकडून घातला जात आहे. राज्यातील चार ठिकाणच्या नर्सिंग कॉलेजमधील प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि अधिव्याख्यातांची रिक्त पदे सेवाज्येष्ठता व अनुभवाच्या पात्रतेचे निकष डावलून विभागाकडून परीक्षा घेऊन भरण्यासाठीचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वी अशा पद्धतीने पदभरती करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी फेटाळून लावला होता. असे असताना पुन्हा काही अधिकारी तात्पुरता बदल करीत फेरप्रस्ताव बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे अनुभवी व सेवा ज्येष्ठ परिचर्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.
मुंबईतील जे.जे. हॉस्पिटल परिसरासह औरंगाबाद, पुणे व नागपूर या ठिकाणी असलेल्या शासनाच्या परिचर्या महाविद्यालयांत पदविकाऐवजी बी.एस्सी (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून पाच वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यासाठीची आवश्यक असलेली अनेक पदेही निर्माण करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत ती भरण्यात आलेली नाहीत. वास्तविक, भारतीय परिचर्या परिषद (आयएनसी) किंवा विद्यापीठाच्या मानकानुसार पदाची भरती होणे आवश्यक असताना काँग्रेस आघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे त्याकडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे युती सरकारने ही पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून घाईघाईने त्याबाबतचा प्रस्ताव बनवून मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला. त्यासाठीचे सेवा प्रवेश नियम अस्तित्वात नसल्याचे दर्शवित विभागांतर्गत मर्यादित परीक्षा घेऊन भरती करण्याचे त्यामध्ये सुचविण्यात आलेले होते. वास्तविक, ही पदे निर्माण झाली त्या वेळीच नवीन प्रवेश नियम बनविणे आवश्यक असले तरी १९९०पासून उपलब्ध असलेल्या नियमांच्या धर्तीवर भरती करणे आवश्यक होते, मुख्य सचिव क्षत्रिय यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी विभागाकडून सादर केलेला प्रस्ताव नामंजूर करत परत पाठविला. त्यानंतरही या पद्धतीने भरतीसाठी प्रयत्नशील असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सेवानियमांच्या प्रस्तावात तात्पुरते बदल करीत विभागाकडून परीक्षा घेऊन भरती करण्यासाठी फेरप्रस्ताव बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळून या रिक्त पदावर भरती होण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी फोन व मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: Outline method for filling posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.