चौकटी बाहेरचा लेखक
By Admin | Published: December 25, 2016 03:55 AM2016-12-25T03:55:38+5:302016-12-25T03:55:38+5:30
ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी निधन झाले. विविध कथासंग्रहांच्या माध्यमातून होवाळांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता.
- ज.वि.पवार
ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी निधन झाले. विविध कथासंग्रहांच्या माध्यमातून होवाळांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता. त्यांच्या साहित्यविषयक आठवणींना दिलेला हा उजाळा...
‘बे नवाड’, ‘येळकोट’, ‘वारसदार’, ‘वाटाआडवाटा’ या दर्जेदार कथासंग्रहाच्या माध्यमातून वामनदादांनी ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकला. मराठी साहित्यातील ‘कथा’ या साहित्य प्रकारातील वामनदादांच्या योगदानामुळे मराठी कथांनी वेगळीच उंची गाठली. त्यामुळेच ग्रामीण जीवनांचे वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या कथा अनेकांच्या पसंतीस उतरल्या.
साहित्यविश्वातील ज्येष्ठ लेखक शंकर पाटील, मिरासदार आणि माडगुळकर यानंतर कथाकार म्हणून वामन होवाळांचे नाव आवर्जून घेतले जाते. सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील भाषेला मराठी साहित्यात स्थान मिळवून देण्याचे अभूतपूर्व काम होवाळ यांनी केले. त्यामुळेच त्यांच्या कथांनी वेगळीच उंची गाठली. आंबेडकरी विचारांचा होवाळ यांच्यावर पगडा होता. त्यामुळे आपसुकच त्यांच्या साहित्यातून आंबेडकरी विचारधारेची किनार डोकावते. दलित समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचारावर त्यांनी त्यांच्या विनोदपर लिखाणातून टिका केली. समाजातील वैगुण्यावर गंभीरपणे भाष्य करणे त्यांना पसंत नव्हते. असे असले तरी गमतीशीर पद्धतीने कथेच्या माध्यमातून मांडलेले विचार हे अधिक खोलवर परिणाम करणारे होते.
साहित्य संमेलनादरम्यान होणाऱ्या त्यांच्या कथावाचनाच्या कार्यक्रमाला गर्दी असायची. इतका समर्थवान लेखक असूनही सरकारने त्यांची कोणत्याही पुरस्कारासाठी स्वत:हून दखल घेतली नाही, ही खंत आहे. पुरस्कार हे केवळ प्रकाशकांनी पुस्तके पाठविल्यामुळेच त्यांना मिळाले आहेत. हे पुरस्कार आणि ती पुस्तके केवळ त्या वर्षभरापुरते मर्यादीत राहिल्याची खंत आहे.
मात्र या साऱ्या गोष्टी बाजूला सारुन त्यांनी साहित्य घडविण्याला महत्त्व दिले. केवळ कथालेखन नाही तर लोकनाट्यातील बतावण्याही ते अगदी छान जुळवत. आम्ही काढलेल्या एका अंकात होवाळ ‘बाबुराव’ या टोपण नावाने ते बतावणी लिहित. त्यांच्या लेखणीतील विशेष सांगायचे झाले तर आपल्या मातीशी नाती सांगणारी अशी भाषा ते वापरत. अनेकदा त्या शब्दांचे अर्थ डिक्शनरीतही सापडणार नाहीत. उदा. ‘देवनाड’ हा शब्द त्यांनी वापरला तेव्हा या शब्दाचा अर्थ लोकांना कळत नव्हता. परंतु देनवाड ही मानसिक प्रवृत्ती असून खोटे सांगा पण दणकून सांगा असा याचा अर्थ होता. प्रचलित भाषेला बाजूला सारत त्यांनी बोलीभाषेला महत्त्व प्राप्त करुन दिले. बाबुराव बागुलानंतर क्षमता असलेला असा हा लेखक होता. पण याची हवी तशी दखल घेतली गेली नाही. वामनदादांनी अनेक मोठ्या साहित्यिकांसोबत काम केले असून मराठी साहित्याला वेगळ््याच उंचीवर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्यासारखा कथाकार होणे नाही.
मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांनी उच्च शिक्षण मुंबईत घेतले. दलित ग्रामीण विश्वाचे प्रत्यंकारी चित्रण त्यांनी रेखाटले. कधी कोपरखळ््या मारत, प्रसंगी चिमटे काढत वास्तव मांडणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करणारे होते. मुंबईतल्या झोपडपट्टीतील वास्तव त्यांनी प्रखरतेने मांडले. कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झालेली त्यांची माणूस (१९५३) ही पहिली कथा विशेष गाजली. आंधळ््याची वरात बहिऱ्याच्या घरात, जपून पेरा बेणं या लोकनाट्याने रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.