स्वच्छतेसाठी ‘आउटसोर्सिंग’
By admin | Published: March 28, 2016 02:09 AM2016-03-28T02:09:12+5:302016-03-28T02:09:12+5:30
स्थानक व आगारांमध्ये असलेली अस्वच्छता, धुळीने माखलेल्या बसेस आणि प्रसाधनगृहांमध्ये पसरलेली दुर्गंधी पाहता एसटी महामंडळ स्वच्छतेकडे लक्ष देणार कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला
मुंबई : स्थानक व आगारांमध्ये असलेली अस्वच्छता, धुळीने माखलेल्या बसेस आणि प्रसाधनगृहांमध्ये पसरलेली दुर्गंधी पाहता एसटी महामंडळ स्वच्छतेकडे लक्ष देणार कधी, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. हा महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी ‘आउटसोर्सिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खासगी संस्था किंवा कंपन्यांना काम देऊन स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे.
एसटी महामंडळाकडे १७ हजार बसेस, १५0 आगार आणि ५00पेक्षा जास्त स्थानके आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला पसारा आणि त्यांची स्वच्छता ठेवण्यात एसटी महामंडळाच्या नाकीनऊ येतात. आगार आणि बसमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांकडून बरीच नाराजीही व्यक्त केली जाते. यासंदर्भात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. एसटी महामंडळाला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न भेडसावत आहे तो स्थानक आणि आगारांमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृहांचा. प्रवाशांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनासही आले आहे. स्थानक व आगारात प्रवाशांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहाचे काम सध्या एका संस्थेकडे असून, त्यांच्याकडून काम नीट होत नसल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे कमी मनुष्यबळामुळे एसटीच्या महत्त्वाच्या आगार आणि स्थानकांमधील स्वच्छतेचे काम हे काही खासगी कंत्राटदारांना देण्यातही आले आहे; पण त्यांच्याकडूनही काम व्यवस्थित होत नसल्याचे समोर आले आहे. बसमधील स्वच्छतेसाठी एसटी महामंडळाने स्वेच्छकही नेमलेले आहेत; पण बसमधील स्वच्छताही फारशी समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले.
एसटीच्या आगार तसेच कार्यशाळेत बसमधील स्वच्छतेसाठी काही आधुनिक यंत्रसामग्रीही
आहे. पण त्यावरच अवलंबून न राहण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)
- स्वच्छतेच्या कामासाठी ‘आउटसोर्सिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम एक किंवा दोन कंपन्यांना देण्यात येईल. त्यांच्याकडून यासाठी काही मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. तर काही साधनसामग्री ही एसटीची असेल, अशी माहिती देण्यात आली. पुढील एका महिन्यात याची निविदा प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.