उत्कृष्ट संसदपटू

By admin | Published: February 17, 2015 02:12 AM2015-02-17T02:12:54+5:302015-02-17T02:12:54+5:30

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य.

Outstanding Parliamentarian | उत्कृष्ट संसदपटू

उत्कृष्ट संसदपटू

Next

आर. आर. आबा लाखांची सभाही सहज जिंकायचे. त्यांचे बोल अंत:करणातून यायचे. त्यामुळे आबा आपलेच दु:ख बोलून दाखवत आहेत असे वाटायचे. हेच त्यांच्या वक्तृत्वाचे रहस्य. व्यवहारातील उदाहरणे, दाखले देऊन ते आपला मुद्दा लोकांच्या मनात पक्का बिंबवायचे. भाषणाच्या ओघात कोपरापासून ढोपरापर्यंत सारखे शब्दप्रयोग करत लोकांना तो मुद्दा उचलून धरण्यास भाग पाडायचे. ज्या विषयावर बोलायचे, त्यावर अपार कष्ट घेण्याची वृत्ती, टिपणे काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
प्रवासात ग्रंथांचे, वृत्तपत्रांचे वाचन अखंड सुरू असायचे. वृत्तपत्रांच्या कात्रणापासून विविध पुस्तकांचे संदर्भ त्यांना मुखोद्गत होते. विधिमंडळाच्या कामकाजासाठी तासन्तास ग्रंथालयामध्ये बसून अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा आदर्शच आबांनी घालून दिला. त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्याला दिला जाणार ‘उत्कृष्ट संसदपटू’ हा पहिला पुरस्कार आबांनी १२ डिसेंबर १९९६ रोजी युती शासनाच्या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना मिळविला. तत्पूर्वी १९९० पासून ‘लक्षवेधीकार’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या विधिमंडळातील भाषणांवर पुस्तकेही निघाली.
६० वर्षे वयाच्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना दरमहा ३०० रुपये निवृत्तीवेतन मिळण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या पहिल्या अशासकीय ठरावाद्वारे शासनाला केलेल्या अनेक विधायक सूचनांमधून गाजविलेले ७ डिसेंबर १९९० रोजी केलेले पहिले भाषण आजही त्या क्षणाच्या साक्षीदारांना आठवत असेल. त्यासाठी नागपूरच्या ग्रंथालयात त्यांनी अभ्यास केला.
२१ एप्रिल १९९३ रोजी पाटबंधारे खात्याच्या अनुदानावरील पूरक मागण्यांच्या चर्चेवेळी कृष्णा-गोदावरी पाणीप्रश्नी लवादानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे ९५० टीएमसी पाणी २००० पर्यंत न अडवल्यास आपली बांधिलकी सरकारबरोबर नसून दुष्काळग्रस्त जनतेबरोबर असेल असा सडेतोड इशारा त्यांनी दिला. युती शासनाच्या काळात तर ते जनसामान्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत अखंड धडाडणारी मुलूखमैदान तोफ ठरले. १९९९ मध्ये ग्रामविकास खात्याचे मंत्री झाल्यावर ७३ व्या व ७४ व्या घटना दुरूस्तीने पंचायत राज व्यवस्थेला संजीवनी देणारे ते ‘अंजनी पुत्र’ ठरले होते.

 

Web Title: Outstanding Parliamentarian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.