भर दुपारी फिल्मी स्टाईलने लुटले १५ लाख !
By Admin | Published: July 14, 2016 08:49 PM2016-07-14T20:49:01+5:302016-07-14T20:49:01+5:30
धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन
ऑनलाइन लोकमत
बीड, दि.१४ - धुम स्टाईल ते दोघे सुसाट मोटारसायकवरून मिनी रिक्षाचा पाठलाग केला. रिक्षात बसलेल्या दोघांच्या डोळ्यात त्यांनी मिरचीपूड फेकली आणि बघता बघता १५ लाखाची रोकड घेऊन तितक्याच सुसाट वेगात ते दोघे निघूनही गेले. गेवराई तालुक्यात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बँकेची रक्कम घेऊन रिक्षातून जात असताना ही घटना घडली.
शहरातील स्टेट बँक आॅफ हैद्राबादची एक शाखा धोंडराई येथे देखील आहे. या शाखेतील रोखपाल विकासकुमार गोपाल शर्मा, शिपाई दीपक आसाराम मुळुक हे दोघे गावातीलच खासगी मिनी प्रवाशी रिक्षातून (क्र. एमएच २३ जेडी २४७१) मधून गेवराईला आले होते. बँकेतून १५ लाख रुपयांची रोकड घेऊन लोखंडी पेटीत भरुन ते रिक्षातून धोंडराईला जात होते. धोंडराई फाट्यावरुन गाडी गावात जाण्यासाठी वळाल्यानंतर विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन पाठमागून आलेल्या दोघांनी चालक किशोर भाऊसाहेब खरात (रा. धोंडराई) यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांनी गाडीचा वेग कमी करताच आत बसलेल्या इतर दोघांच्या दिशेनेही त्यांनी मिरची पूड फेकली; परंतु ती डोळ्यात गेली नाही. चालकाने गाडी रोखल्यावर दुचाकीवरील दोघेही खाली उरतले. त्यांनी ह्यपेटी माझ्याकडे देह्ण असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर शिपाई मुळूक याने हात वर केले. त्याच्या दिशेने कोयत्याचा वार केल्यावर बोटाला किरकोळ जखम झाली. त्याने हात सोडताच चोरांनी पेटी घेऊन दुचाकीवरुन उमापूरच्या दिशेने पलायन केले. भयभीत अवस्थेत रोखपाल शर्मा यांनी गेवराई ठाण्यात कळविले. त्यानंतर निरीक्षक सुरेश बुधवंत फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी मिनी रिक्षा ताब्यात घेतला. दोन मिरचीपूडही आढळून आल्या. वाहनचालकासह तिघांकडे विचारपूस सुरु असून गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बँक अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
धोंडराई येथील शाखेत गेवराई येथील बँकेतून आवश्यकता भासेल तशी रोकड नेली जात होती. त्यासाठी दोन वर्षांपासून गावातीलच किशोर खरात यांचा मिनी रिक्षा भाड्याने घेतला जात होता. हा रिक्षा सुरक्षेच्या दृष्टिने धोक्याचा आहे. शिवाय सुरक्षारक्षकाविनाच मोठ्या रकमेची ने- आण केली जायची. ते बँक अधिकाऱ्यांच्या अंगलट आले.
तोंडाला रुमाल
दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी आपल्या तोंडांवर रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे मुश्किल बनले आहे. बँक अधिकारी व चालकानेही त्यांचा चेहरा नीट पाहिलेला नाही. दहशत निर्माण करुन मिरची पूड व कोयत्याचा वापर करत रक्कम पळविणाऱ्या दोन चोरांनी पाळत ठेवून कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.