राज्यात ७० हजारांवर कोरोनाचे रुग्ण; दिवसभरात २,३६१ जणांना झाला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 07:02 AM2020-06-02T07:02:46+5:302020-06-02T07:03:02+5:30
मृतांचा आकडा २,३६२ : सोमवारी ७६ जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या एका बाजूला वाढतेय, तर दुसऱ्या बाजूला कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीही वाढत असल्याची दिलासादायक माहिती सोमवारी आरोग्य विभागाने दिली. राज्यात दिवसभरात २ हजार ३६१ कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे कोरोना (कोविड-१९) रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. तर सोमवारी ७६ जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या २ हजार ३६२ झाली आहे. सध्या राज्यात ३७ हजार ५३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ७७९ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ३० हजार १०८ जण कोविडमुक्त झाले आहेत.
राज्यात दिवसभरात ७६ बळी गेले. त्यात मुंबईतील ४०, मीरा भार्इंदर ६, नवी मुंबई ६, वसई विरार ३, रायगड २, कल्याण डोंबिवली २, ठाणे १, नाशिक १, पुणे ८, पिंपरी चिंचवड १, औरंगाबाद मनपा ३, जालना १, बीड १ आणि नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरातील ७६ बळींपैकी ४५ पुरुष तर ३१ महिला आहेत. ७६ पैकी ३७ रुग्ण ६० व ६० हून अधिक वयोगटातील आहेत. तर ३६ रुग्ण ४० ते ५९ वयोगटातील आहेत. या ७६ रुग्णांपैकी ५१ जणांमध्ये ६७ टक्के मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३ टक्के झाले आहे, तर मृत्यूचा दर ३.३७ टक्के आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ७१ हजार ५७३ नमुन्यांपैकी ७० हजार १३ पॉझिटिव्ह आहेत.राज्यात ३ हजार २९४ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. त्यात सोमवारी १८ हजार ६७४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून ७०.६९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.