'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'साठी आत्तापर्यंत किती अर्ज आले? मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 07:44 PM2024-07-20T19:44:43+5:302024-07-20T19:45:30+5:30
Aditi Tatkare : विरोधकांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या टीकेला सुद्धा अदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झाल्याचे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच, विरोधकांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या टीकेला सुद्धा अदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या बारामतीत बोलत होत्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी रोज ८ ते १० लाख अर्ज येत असून आत्तापर्यंत ७२ लाखांपेक्षा जास्त अर्जांची नोंदणी झाली आहे. यावरूनच लक्षात येत आहे की, किती उत्सुकता महिलांना या योजनेच्या बाबत वाटत आहे. विरोधक पहिला दिवसांपासूनच या योजनेसंदर्भात टीका करत आहेत. मात्र मला आवर्जून सांगायचे आहे की, या योजनेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी ही गोष्ट समाधानकारक आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.
जे टीका करत आहेत, ते त्यांच्या मतदार संघात त्यांचे बॅनर लावून कॅम्प आयोजित करत आहेत. त्यामुळे महायुती सरकारने आणलेली ही योजना माता भगिनींसाठी किती उपयुक्त आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींना माहिती आहे. त्यामुळे एका बाजूला टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला कॅम्प आयोजित करायचे, तसेच वेगळे बॅनर लावून दिशाभूल करायची, अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, या योजनेचे वितरण १५ ऑगस्ट ते रक्षाबंधन या दिवशी कसे मिळतील, हा आमचा मानस आहे. या योजनेमध्ये महिलांना आव्हान आहे की कुठल्याही भूलथापांना पण बळी पडू नका. गावामध्ये शहरांमध्ये कोणताही शासकीय अधिकारी उपलब्ध असेल. तसेच, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून देखील फॉर्म नोंदणी करू शकता. ही एकमेव योजना अशी आहे की ती तुम्ही तुमच्या घरी बसून देखील मोबाईल वरती फॉर्म भरू शकता, असे अदिती तटकरे म्हणाल्या.
दरम्यान, राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत होणार आहे. या योजनेसाठी राज्यातील महिलांचे फॉर्म भरण्यात येत आहेत. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, सर्वर डाऊनची समस्या, महिलांकडून फॉर्म भरून घेताना घेतले जाणारे पैसे, यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला मंत्री अदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.